नाकाडोंगरी परिसरातील आठ गावे अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 10:24 PM2018-01-11T22:24:33+5:302018-01-11T22:24:46+5:30
तालुक्यातील आष्टी गावठाण फिडर कृषी फिडरला जोडण्यात आल्यामुळे कधी ट्रिपिंग तर कधी भारनियमनाचा फटका बसत असल्यामुळे नाकाडोंगरी परिसरातील आठ गावे मागील सहा महिन्यांपासून अंधारात आहेत.
राहुल भुतांगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील आष्टी गावठाण फिडर कृषी फिडरला जोडण्यात आल्यामुळे कधी ट्रिपिंग तर कधी भारनियमनाचा फटका बसत असल्यामुळे नाकाडोंगरी परिसरातील आठ गावे मागील सहा महिन्यांपासून अंधारात आहेत. परंतू महावितरणने उपाययोजना न केल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
तुमसर तालुक्यातील ग्रामीण भागात अघोषीत भारनियमन होणे हे आता नित्याचे झाले आहे. परिणामी ग्रामीण जनता हताश झाली आहे. महावितरणने कृषी व घरगुती वीज धारकांसाठी थ्री फेज व सिंगल फेज योजना अंमलात आणून नवीन गावठान फिडरची स्थापना करून भारनियमनमुक्त करण्यात आले होते.
मात्र मागील सहा महिन्यापासून आष्टी गावठान ११ केव्ही फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या फिडर अंतर्गत येणाºया चांदमाराटोली, डोंगरीबुज, टोली, लोभी, आष्टी, नाकाडोंगरी, पाथरी, कवलेवाडा, धुटेरा ही आठ गावे प्रभावित होत आहेत. त्यामुळे महावितरणने गावठान फिडरला कृषी फिडरशी तात्पुरती जोडणी केली व नागरिकांना होणारा त्रास कमी केला. परंतु कृषी फिडरच्या थ्री फेज लाईनवर भारनियमन तर आहेच याशिवाय आठ गावांचा भार वाढल्यामुळे वारंवार लाईट ट्रिप होणे तर कधी अनिश्चित वेळेसाठी लाईट बंद होणे, हा प्रकार सुरू झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना जीव मुठीत जगावे लागत आहे. याप्रकरणी महावितरणकडे मागील सहा महिन्यांपासून अनेकदा लेखी तक्रारी वरिष्ठ अधिकाºयांना केल्या. परंतु महावितरणने अद्याप लक्ष न दिल्यामुळे नागरिकांच्या समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांची आता सहनशिलता संपली असल्यामुळे असंतोष खदखदत आहे.
याप्रकरणाचे गांभीर्य ओळखून महावितरणने समस्येचे निराकरण करणे गरजेचे आहे. याबाबत गोबरवाही उपविभागाचे कनिष्ठ अभियंता अरविंद पंधरे यांच्या भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.