ज्येष्ठ म्हणतात, विकासासोबत संस्कृतीही जपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:36 AM2021-08-15T04:36:45+5:302021-08-15T04:36:45+5:30

भंडारा : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे आता पूर्ण होत आहेत. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भंडारा जिल्ह्यातील काही ज्येष्ठ, ...

The elders say, along with development, also preserve the culture | ज्येष्ठ म्हणतात, विकासासोबत संस्कृतीही जपा

ज्येष्ठ म्हणतात, विकासासोबत संस्कृतीही जपा

Next

भंडारा : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे आता पूर्ण होत आहेत. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भंडारा जिल्ह्यातील काही ज्येष्ठ, तरुण व तरुणींसोबत संवाद साधला असता स्वातंत्र्याची नवी पहाट उगवावी असा त्यांच्या बोलण्यातून आशय व्यक्त झाला तसेच ज्येष्ठांच्या मते आधुनिकीकरणात विकासासोबत संस्कृतीलाही जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अशी बोधक, सूचक प्रतिक्रियाही त्यांनी दिली

आपण कुठे चाललोय याचं भान ठेवा

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. देशाने प्रगती केली आणि करीत आहे. यात मतभेद नाहीत. मात्र, आपण पूर्वी काय होतो, आज आपण काय करतोय याचं भान तरुण पिढीने आणि राज्यकर्त्यांनीही ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कधी कधी समोर पाहत असताना आपली पावलं कोणत्या दिशेने आहेत त्याबाबत सजग असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. धर्म-राजकारण यापेक्षा देशप्रेम आणि देशहित महत्त्वाचे आहे हे आजच्या पिढीला बिंबवून सांगितलं पाहिजे.

- आनंदराव चरडे, ज्येष्ठ नागरिक भंडारा

मिळालेल्या स्वातंत्र्याची जाणीव ठेवा

स्वातंत्र्य अथक प्रयत्नातून मिळाले आहे. अनेक थोर माहात्मे, नेते आणि क्रांतिवीरांनी बलिदान दिले आहे. त्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत. इतिहासात किंवा भूतकाळात घडलेल्या बाबीतून अनुभव लक्षात घेता समोरची वाटचाल करावी. मिळालेल्या स्वातंत्र्याची जाणीव प्रत्येक नागरिकाने एक ज्योती रूपाने आपल्या मनात तेवत सदैव ठेवावी, असे मला वाटते. देश खूप प्रगती करू शकतो. मात्र, त्या दिशेने वाटचाल करावी लागणार आहे.

- बाळकृष्ण घाट बांदे, ज्येष्ठ नागरिक भंडारा

लोकशाहीची अवमानना कदापि होऊ नये. भारत हा लोकशाही संसदीय प्रणालीचा देश आहे. देशाचं सार्वभोमत्व याला कधीही तडा जाऊ न देता वाटचाल करावी. देशात असंख्य समस्या आहेत. भ्रष्टाचार, सिंचन व्यवस्था, बेरोजगारी, महागाई यासह असंख्य प्रश्न आपल्याला भेडसावत आहेत. मात्र, या सर्व प्रश्नांची उकल लोकशाही पद्धतीनेच करता आली पाहिजे. माणसाने माणसाला मदत करीत, भारताने या संस्कृतीची मुहूर्तमेढ रोवून संपूर्ण विश्वाला मानवतेचा संदेश दिला आहे. त्यामुळे लोकशाही पद्धतीतच राहून देशाला विकासाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.

- आनंदराव कुंभारे, ज्येष्ठ नागरिक, भंडारा

विकासाचे नवे दालन सुरू व्हावे

स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. विकास होत आहे यात दुमत नाही; पण त्या अपेक्षेने रोजगाराची संधी निर्माण होताना दिसून येत नाही. करणाऱ्यांना कामाची कमी नाही; पण तरुण वर्ग उपाशी राहणार काय असा प्रश्न उपस्थित होतोय. विकासाचे नवे दालन सुरू करताना युवांच्या हाताला काम उपलब्ध होईल, असे नियोजन करणे अपेक्षित आहे.

- महेश नंदनवार, भंडारा

सर्वांना विकासाच्या प्रवाहात आणणे गरजेचे

प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधानाने प्रदान केलेल्या अधिकाराबरोबर कर्तव्याचीसुद्धा जाणीव असायला पाहिजे. आजची युवा पिढी ही देशाच्या विकासाचा कणा आहे. भारतात अशी अनेक गावे आहेत, जिथे विजेचा एक खांबही नाही. आज देशासाठी बलिदान देण्याची गरज नाही, तर जिवंत राहून सर्वांना विकासाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे.

- अश्विन साखरे, भंडारा

युवक-युवतींनी स्वावलंबी बनावे

गरीब जनता असेल, पीडित, शोषित, वंचित अशा सर्वांच्या आयुष्यात बदल आणणायासाठी, सुख आणण्यासाठी स्वातंत्र्याचे महत्त्व ओळखून त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. शासनच सर्व काही करेल ही भावना मनातून काढून आजचा युवक स्वावलंबी बनला पाहिजे.

- श्यामलता कोटांगले, भंडारा.

लोकशक्ती विकसित व्हावी

देश प्रगती करतो तो लोकशक्तीमुळे, लोकशक्तीच्या भावनेमुळे, त्यांच्या संकल्पामुळे, लोकशक्तीच्या पुरुषार्थामुळे, लोकशक्तीच्या स्वप्नपूर्तीच्या ध्येयामुळे, बलिदानामुळे या सगळ्या गोष्टींची ऊर्जा मिळाली तरच देश पुढे जातो. जनहिताचे अनेक कायदे संमत होत आहेत. दीर्घकाळापासून जनहिताचे कायदे मंजूर होत आहेत. मात्र, त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी यंत्रणेने सर्वसामान्यांशी जुळवून घेणे आवश्यक आहे.

- प्रशांत डोमळे, भंडारा.

Web Title: The elders say, along with development, also preserve the culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.