मोहाडी तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींची निवडणूक स्थगित; उत्साहावर विरजण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 10:36 AM2022-11-23T10:36:36+5:302022-11-23T10:48:58+5:30

राज्य निवडणूक आयोगाचे आदेश : सरपंचपदाचे आरक्षण चुकीचे असल्याचा ठपका

Election of 58 gram panchayats in Mohadi taluka of bhandara dist suspends; allegation that reservation of sarpanch post is wrong | मोहाडी तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींची निवडणूक स्थगित; उत्साहावर विरजण

मोहाडी तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींची निवडणूक स्थगित; उत्साहावर विरजण

Next

भंडारा : सरपंच पदाच्या आरक्षणात झालेल्या चुकीने मोहाडी तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींची निवडणूक स्थगित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी दिले. चुकीचे आरक्षण काढणाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याचेही या आदेशात म्हटले आहे.

भंडारा जिल्ह्यातील ३६३ ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित झाली होती. त्यात मोहाडी तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींचा समावेश होता. तहसीलदारांनी निवडणूक नोटीसही प्रसिद्ध केली होती. २८ नोव्हेंबरपासून नामांकनाला प्रारंभ होणार होता. मात्र मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने तालुक्यातील सर्व ५८ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्य निवडणुकीला स्थगिती दिली आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये शासनाने केलेल्या सुधारणेनुसार सरपंचपदाची निवड थेट जनतेतून होणार आहे. मात्र, मोहाडी तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाचे आरक्षण चुकीच्या पद्धतीने झाल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले. आता नव्याने आरक्षण प्रक्रिया राबविणे आवश्यक झाले आहे. मात्र, ९ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमान्वये निवडणूक घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे या ५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच मोहाडी तहसीलदारांनी प्रसिद्ध केलेली निवडणूक नोटीसही या आदेशाने रद्द करण्यात आली आहे.

निवडणूक स्थगित झाल्याची माहिती होताच संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली. गावागावांत निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली होती. मात्र, आता निवडणूक स्थगित झाल्याने उत्साहावर पाणी फेरले आहे.

दोन आठवड्यांत अहवाल सादर करा

मोहाडी तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात झालेल्या चुकीने निवडणूक स्थगित करण्याची वेळ निवडणूक आयोगावर आली आहे. चुकीचे आरक्षण काढण्यास जबाबदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि त्याबाबत अहवाल निवडणूक आयोगास दोन आठवड्यांच्या आत सादर करावा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यमूर्ती यांनी भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

Web Title: Election of 58 gram panchayats in Mohadi taluka of bhandara dist suspends; allegation that reservation of sarpanch post is wrong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.