साकोलीत विषय समितीची निवडणूक २४ ला होणार
By admin | Published: January 22, 2017 12:22 AM2017-01-22T00:22:39+5:302017-01-22T00:22:39+5:30
नगरपरिषद साकोलीच्या विषय समित्यांची निवडणूक २४ तारखेला घेण्याचे आदेश धडकले असून विषय समितीच्या सभापतीपदी कुणाची वर्णी लागेल
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धडकले : सभापतीपदासाठी कुणाची वर्णी लागणार
संजय साठवणे साकोली
नगरपरिषद साकोलीच्या विषय समित्यांची निवडणूक २४ तारखेला घेण्याचे आदेश धडकले असून विषय समितीच्या सभापतीपदी कुणाची वर्णी लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असले सभापतिपद आपल्याला मिळावे, यासाठी भाजपाच्या नगरसेवकात चढाओढ सुरू आहे. यातही ‘स्वामीजी’ची कृपा कुणावर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगरपरिषद निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांना धरून भाजपची सदस्य संख्या १७ झाली आहे. त्यामुळे साकोली नगरपरिषदेवर भाजपची एकहाती सत्ता आहे. भाजपची एकहाती सत्ता असल्यामुळे विषय समितीही भाजपच्याच नगरसेवकांना मिळणार यात शंका नाही. साकोली नगरपरिषदेत पाच विषय समित्या स्थापन होणार आहेत. पैकी स्थायी समितीचे अध्यक्षपद हे अध्यक्षासाठी पदसिद्ध राखीव असल्यामुळे स्थायी समितीचे अध्यक्ष हे नगरपरिषदेचे अध्यक्ष धनवंता राऊत याच असतील.
साकोली नगरपरिषदेत आरोग्य समिती, बांधकाम समिती, जल व मल संनियंत्रण समिती व महिला व बालविकास अशा चार समितीचा समावेश असून महिला व बाल कल्याण समितीवर महिला नगरसेवक सभापती असतो. त्यामुळे उर्वरित तीन समित्यावर व महिला व बालकल्याण समितीवर कुणाची वर्णी लागते हे २४ तारखेलाच स्पष्ट होणार आहे.
निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी तरूण मल्लानी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर अनिता पोगडे यांची गटनेता, जगन उईके यांची उपगटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे तर राजश्री मुंगूलमारे यांची निवड झाली आहे. विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी उपाध्यक्ष तरूण मल्लानी, नालंदा टेंभुर्णे, वनिता डोये, राजश्री मुंगुलमारे, पुरूषोत्तम कोटांगेले व जगन उईके यापैकीचार जणांची वर्णी लागण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.