तुमसर- तिरोडी रेल्वेमार्गावर विजेवरील गाड्या धावणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:32 AM2021-04-12T04:32:55+5:302021-04-12T04:32:55+5:30
विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर : प्रथम धावणार मालगाडी. मोहन भोयर तुमसर : ब्रिटिशकालीन तुमसर तिरोडी या ४३ किलोमीटर रेल्वे मार्गावर ...
विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर : प्रथम धावणार मालगाडी.
मोहन भोयर
तुमसर : ब्रिटिशकालीन तुमसर तिरोडी या ४३ किलोमीटर रेल्वे मार्गावर लवकरच विजेवरील गाड्या धावणार आहेत. सध्या या रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. कोरोना संक्रमण काळातही येथे विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. तुमसर ते गोबरवाही पर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. घनदाट जंगलातून हा रेल्वे मार्ग जातो. मध्यप्रदेशातील तिरोडीपर्यंत हा रेल्वे मार्ग जातो.
मुंबई- हावडा रेल्वे मार्गावर विजेवर गाड्या धावतात. तुमसर रोड ते तिरोडी दरम्यान डिझेल इंजिनवर माल गाड्या व प्रवासी गाड्या धावतात. तत्पूर्वी कोळशावर चालणाऱ्या गाड्या या मार्गावर धावत होत्या. ४३ किलोमीटरच्या हा रेल्वे ट्रॅक असून ब्रिटिशांनी हा रेल्वे मार्ग तयार केला होता. डोंगरी, चिखला व मध्यप्रदेशातील तिरोडी येथील मँगनीज खाणीतून मँगनीजच्या वाहतुकीकरिता हा रेल्वे मार्ग तयार करण्यात आला होता. रेल्वे मंत्रालयाने तुमसर तिरोडी या रेल्वे ट्रॅकवर विजेवरील गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने विद्युतीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे.
सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी:
तुमसर तिरोडी या रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा आयुक्त यांचेकडून तपासणी होणार आहे. पथकाचे अहवालानंतर या रेल्वेची पहिली चाचणी घेण्यात येईल.
सुरक्षा आयुक्तांकडून मालवाहतूक व प्रवासी गाड्या चालविण्याची परवानगी मिळाल्यानंतर रेल्वे गाड्या या मार्गावर धावायला सुरुवात होईल. इलेक्ट्रिक विभागातील सुरक्षा पथकासह तज्ज्ञांचे पथक येथे सहभागी होणार आहेत. विजेचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकावर उपकेंद्र, वीजवाहिन्या, विद्युत खांब येथे उभारण्यात आले आहेत. वाहिन्यांमधून वीज प्रवाह सोडण्याची प्रथम येथे चाचणी होणार आहे.
पहिली मालगाडी धावणारी: तुमचा तिरोडी रेल्वेमार्गावर सर्वप्रथम पहिली मालगाडी धावणार आहे सुरक्षा आयुक्तांकडून हिरवी झेंडी मिळाल्यावर पहिली मालगाडी चालवण्यात येईल. त्यानंतर प्रवासी गाड्या येथे धावतील. मध्य प्रदेशाला जोडणारा हा एकमेव रेल्वे मार्ग असून तिरोडी कटंगी व जबलपूर रेल्वे मार्ग मध्य भारतात जाण्यासाठी कमी वेळेत जाणारा ठरणार आहे.