पाणी पुरवठा योजनेअंतर्गत २२.९० लाख रुपयांचे वीजबिल थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:23 AM2021-06-23T04:23:45+5:302021-06-23T04:23:45+5:30
दयाल भोवते लाखांदूर : शासनाच्या विविध पाणी पुरवठा योजनांनुसार ग्रामीण क्षेञात तालुक्यातील ६२ ग्राम पंचायत अंतर्गत कार्यान्वित पाणी पुरवठा ...
दयाल भोवते
लाखांदूर : शासनाच्या विविध पाणी पुरवठा योजनांनुसार ग्रामीण क्षेञात तालुक्यातील ६२ ग्राम पंचायत अंतर्गत कार्यान्वित पाणी पुरवठा योजनेअंतर्गत तब्बल २२.९० लाख रुपयांचे वीजबिल थकीत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार तालुक्यातील १३ पाणी पुरवठा योजनांचा वीजबिलाचा भरणा न करण्यात आल्याने वीज पुरवठा खंडित केल्याची माहिती देण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील ६२ ग्रामपंचायत क्षेत्रात शासनाच्या विविध पाणी पुरवठा योजनांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध केले जात आहे. मात्र, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाने ग्रामीण भागातील नागरिकांद्वारे पाणी कराचा भरणा न करण्यात आल्याने तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीअंतर्गत तब्बल २२.९० लाख रुपयांचे वीजबिल थकीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तथापि, तालुक्यातील काही ग्रामपंचायती अंतर्गत गत काही महिन्यांपासून पाणी पुरवठा योजनेच्या वीजबिलाचा भरणा न करण्यात आल्याने तालुक्यातील १३ पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
सदर स्थितीत स्थानिक नागरिकांना पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत नसल्याने नागरिकांत स्थानिक प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. वीजबिलाचा भरणा न करण्यात आल्याने गत काही दिवसांपासून वीज कंपनीअंतर्गत तालुक्यातील विविध गावांतील पथदिवे, पाणी पुरवठा आदी योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तथापि वीज कंपनीद्वारे सदरची कारवाई करताना तालुक्यातील विविध ग्रा. पं. अंतर्गत शासनाने या कारवाईचा विरोध करून वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली जात आहे.
बॉक्स :
कृषी वीज पंपांचे ३.६८ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत
तालुक्यातील इटियाडोह बांध व कृषी वीज पंपाअंतर्गत मोठ्या प्रमाणात सिंचन सुविधा उपलब्ध केली जाते. तालुक्यातील विविध क्षेत्रात इटियाडोह बांध अंतर्गत कालव्याच्या आधारे सिंचन सुविधा उपलब्ध होणाऱ्या क्षेत्रासह अन्य क्षेत्रातील कृषी वीज पंपांद्वारे सिंचन सुविधा उपलब्ध केली जात आहे. तालुक्यात एकूण ५ हजार ५८६ कृषी वीज पंपधारक शेतकरी आहेत. मात्र, या शेतकऱ्यांकरवी गत काही वर्षांपासून कृषी वीज पंपाच्या वीज बिलाचा भरणा न करण्यात आल्याने तालुक्यात ३.६८ कोटी रुपये थकीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.