उन्हाळ्यात वीज टिकेना, त्यात डासांची भुणभुणही झोपू देईना !
By युवराज गोमास | Published: March 28, 2024 06:46 PM2024-03-28T18:46:05+5:302024-03-28T18:46:16+5:30
जिल्ह्यात उन्हाचा पारा ४० अंशांवर पोहोचला आहे. कडक उन्हाचा चटका सर्वांना बसतो आहे. पंखा, कुलर, एसीशिवाय झोपच येत नाही; परंतु, वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांत असंतोषाची भावना आहे.
भंडारा : जिल्ह्यात घरगुती वीज ग्राहकांची संख्या २ लाख ८२ हजार ९८ इतकी आहे; परंतु, विद्युत विभागाचा मनमर्जी कारभार सुरू असल्याची परिस्थिती ऐन उन्हाळ्यात दिसून येत आहे. विद्युत विभागाचा सर्वाधिक त्रास शहरांपेक्षा ग्रामीण भागात अधिक दिसून येत आहे. दिवस-रात्र केव्हाही विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने उकाडा असह्य होत आहे. त्याच डासांचा प्रकोप वाढल्याने नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे. सर्दी, ताप, खोकला व न्यूमोनियाचे आजार बळावले आहेत.
जिल्ह्यात उन्हाचा पारा ४० अंशांवर पोहोचला आहे. कडक उन्हाचा चटका सर्वांना बसतो आहे. पंखा, कुलर, एसीशिवाय झोपच येत नाही; परंतु, वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांत असंतोषाची भावना आहे. जिल्ह्यात वारंवार विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने उकाडा असह्य होत असतो. शिवाय बत्ती गुल होताचा डास हल्ला चढवीत असल्याने नागरिकांची झोपमोड होत आहे. तासाभराच्या अंतराने, तर कधी अर्ध्या तासाच्या अंतराने विद्युतपुरवठा खंडित केला जात असल्याने व्यावसायिकही बेजार आहेत. दिवसभर काबाडकष्ट उपसून रात्री सुखाची झोप घ्यावी तरी कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बॉक्स
रात्री-बेरात्री होतेय बत्ती गुल
जिल्ह्यातील ग्रामीण भागात खंडित वीजपुरवठ्याने हाहाकार उडत आहे. खंडित वीजपुरवठ्याचा प्रकार आठवड्याभरापासून सुरू आहे. अद्याप भारनियमन सुरू झालेले नाही; परंतु, अवेळी बंद होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे ग्राहकांना उकाड्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बॉक्स
बिल वाढले, सुविधा का नाही?
वीज महामंडळाने महिनाभरात थकीत बिलासाठी २५५९ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला. यात घरगुती वीज ग्राहकांची संख्या सर्वाधिक म्हणजे २०९५ इतकी आहे; तर व्यावसायिक ग्राहकांची संख्या ४०३ असून औद्योगिक ग्राहकांची संख्या ६१ आहे. महावितरण ज्याप्रमाणे वसुलीकडे लक्ष घालते, त्याप्रमाणे वाढलेल्या बिलांच्या समस्येकडे व सुविधांकडे लक्ष का देत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.
बॉक्स
उपविभागनिहाय घरगुती ग्राहक
उपविभाग ग्राहक संख्या
भंडारा ग्रामीण ३९१३८
भंडारा शहर ३१५९६
मोहाडी ३३६२९
पवनी ३८०२९
तुमसर ४८८५२
लाखांदूर २६५११
लाखनी ३०७४९
साकोली ३३५९४
एकूण २,८२,०९८
डासांची पिल्लावळ वाढीस
शहरांसह ग्रामीण भागात भर उन्हाळ्यात डासांची पैदास वाढीस लागली आहे. रात्रीला डासांच्या झुंडी आक्रमण करीत असल्याने सध्या पंख्यात झोपणे कठीण होत आहे. नाल्या व गटारांमध्ये साचलेल्या घाणीत डासांची पैदास वाढीस लागली आहे. संबंधित यंत्रणांनी याकडे लक्ष देत औषध फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.