धान पीक तुडवत हत्तींचा कळप पोहोचला बरडकिन्ही जंगलात; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2022 05:20 PM2022-12-01T17:20:26+5:302022-12-01T17:23:51+5:30
२३ जंगली हत्तींचा कळप लाखनी वनपरिक्षेत्रात
भंडारा/लाखनी : तीन दिवसांपासून जिल्ह्यात असलेला हत्तींचा कळप धान पीक तुडवत बुधवारी लाखनी तालुक्यातील बरडकिन्ही जंगलात पोहोचला. रेंगेपार कोहळी येथील शेतशिवारातील धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वनविभागाचे पथक या हत्तीवर नजर ठेवून असून, हत्ती गावात शिरू नये म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान, हत्तीला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
गोंदिया जिल्ह्यातून सोमवारी (दि. २८) साकोली तालुक्यातील सानगडी वनक्षेत्रात २३ जंगली हत्तींचा कळप दाखल झाला. या कळपाने परिसरातील धान पिकाचे नुकसान केले होते. त्यानंतर मंगळवारी हा कळप मोहघाटा जंगल परिसरात पोहोचला. बुधवारी पहाटे लाखनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बरडकिन्ही जंगलात तो दाखल झाला. त्यानंतर पहाटे २.३० वाजताच्या सुमारास रेंगेपार कोहळी येथील शेतात या हत्तींचे वास्तव्य होते.
हत्तींचा कळप शेतातून गेल्याने शेतकरी दिलीप कापगते, महेश कामथे, मोरेश्वर मांढरे, नीळकंठ जीवतोडे यांच्यासह इतर सहा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हत्तींच्या पावलांनी शेतातील धान तुडविला गेला; तर शेतात लावून ठेवलेल्या धान पुंजण्यांचे नुकसान झाले. झाडे तोडली, धुरेही खराब केल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर पहाटे ४.३० वाजता हा कळप पुन्हा बरडकिन्ही जंगलात निघून गेला. सायंकाळी रेंगेपार कोहळी येथील इंदिरानगरजवळ हत्तींचे वास्तव्य आहे.
हत्तींचा कळप शेतकऱ्यांचे नुकसान करीत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. दुसरीकडे, गावकरी हत्ती पाहण्यासाठी जात असल्याने अपघाताचीही भीती पसरली आहे. दुसरीकडे, गावकरी हत्ती पाहण्यासाठी जात असल्याने अपघाताचीही भीती पसरली आहे. नागरिकांनी हत्तीला बघण्यासाठी जंगलात प्रवेश करू नये, सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
वनविभागाने केले नुकसानीचे पंचनामे
वनविभागाचे पथक या हत्तींवर नजर ठेवून आहे. हत्तींच्या कळपाने शेती पिकांचे नुकसान केले. त्या क्षेत्राची पाहणी वनविभागाच्या वतीने करण्यात आली. नुकसान भरपाईसाठी पंचनामे करण्यात आले. शासन निर्णयानुसार या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तत्परतेने देण्यात येणार आहे, असे उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग ओलांडण्याची शक्यता
मोहघाटा परिसरातील वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक १८८ मधून या कळपाने वनविकास महामंडळाच्या लाखनी तालुक्यातील कक्ष क्रमांक ३८० मध्ये प्रवेश केला आहे. हत्तीच्या हालचालींवरून हा कळप राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ ओलांडून जाण्याची बुधवारी रात्री शक्यता आहे. त्यामुळे पोलिस व महसूल प्रशासनाची मदत घेण्यात येणार आहे.