मुला - मुलीतील समूळ भेदभाव मिटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:35 AM2021-02-10T04:35:40+5:302021-02-10T04:35:40+5:30
पालांदूर : ओ माय बापहो, मुलीला वाचवा. मुलापेक्षा मुलगी कुठेही कमी नाही. मुलगी ही दोन्ही कुळांचा उद्धार करते. मुलगी ...
पालांदूर : ओ माय बापहो, मुलीला वाचवा. मुलापेक्षा मुलगी कुठेही कमी नाही. मुलगी ही दोन्ही कुळांचा उद्धार करते. मुलगी ही प्रेमाची खाण आहे. मुलीला वाचवा, कुटुंब सावरा, असे आवाहन भागवतकार मुक्ताश्रीताई यांनी पाचव्या दिवसाचे दुसरे पुष्प गुंफताना सांगितले. मुलीचे महात्म्य वर्णन करीत गोवर्धन पर्वताची कथा सांगताना निसर्गाचा समतोल राखण्यासाठी साक्षात भगवंताने गोवर्धन सांभाळले तसेच कुटुंब सांभाळण्याकरिता आपण मुलीला सांभाळू, असे मार्मिक भक्तिमय वातावरणात धर्मशास्त्राचा आधार घेत भक्तगणांना प्रबोधन केले.
प्रत्येक कुटुंबात स्त्रीचा सन्मान अत्यंत आवश्यक आहे. 'मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देतो दोन्ही घरी' . तेव्हा जनहो, राष्ट्रसंत तुकडोजी, गाडगे महाराज यांनी दिलेल्या थोर विचारांची अंमलबजावणी करा व कुटुंब सुखी करा, असे आवाहन केले.
मुलगा हा वंशाचा दिवा आहे. या एकाच विचारापोटी मुलींची हत्या केली जाते. कित्येक मातांच्या पोटातच भ्रूणहत्या होते. निश्चितच हे निंदनीय आहे. विरांगनांच्याच देशातील विरांगनांना जन्माला येण्याआधी मारले जात आहे.
समाजातील आसुरी प्रवृत्तीच प्रलयाला निमंत्रण देणारे ठरते. जन्मल्यानंतरही स्त्रीची अवहेलना कमी होत नाही. जी मुलगी आमची शान आहे, जी भावाला राखी बांधते, सासराचे स्वप्न पूर्ण करते, पारिवारिक सेवेचे व्रत मरेपर्यंत सांभाळते, अशा या परमेश्वररुपी मूर्तिमंत प्रेमरूपी माऊलीला सांभाळा. धर्मशास्त्र व मानवतावाद सांगत सांसारिक गाडा सुरळीत चालणेकरिता स्त्री-पुरुष यांनी एकमेकाला सांभाळीत भगवत भक्तिचा आधार घेत संसार गोड करावा, असे स्त्री महात्मे या विषयात सखोल कथांचा आधार घेत प्रबोधन केले.