प्राथमिक शाळेच्या बोलक्या भिंती विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:31 AM2021-01-21T04:31:40+5:302021-01-21T04:31:40+5:30
मुखरू बागडे पालांदूर : शालेय शिक्षणाकरिता उपयुक्त शैक्षणिक वातावरण निर्मितीत डिजिटल पब्लिक स्कूल अर्थात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ...
मुखरू बागडे
पालांदूर : शालेय शिक्षणाकरिता उपयुक्त शैक्षणिक वातावरण निर्मितीत डिजिटल पब्लिक स्कूल अर्थात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालांदूर अग्रेसर आहे. कोरोना काळात वेळेचा सदुपयोग करीत शाळेचे भव्यदिव्य पटांगण सुसज्ज करण्यात आले आहे. यातील भिंतीला बोलके करीत विविध ज्ञानार्जनाचे धडे विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत आहेत.
कोरोना संकट काळापासून सर्वसामान्यांचे जीवन संकटात सापडले होते. मात्र गत महिनाभरापासून कोरोनाची लागण अत्यल्प जाणवत आहे. ग्रामीण भागात कोरोनाची भीती दूर झालेली आहे. आता लस सुद्धा उपलब्ध झाल्याने, वास्तव परिस्थितीचा आधार घेत बंद असलेल्या प्राथमिक शाळा सुरू कराव्यात. जेणेकरून चिमुकल्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल. अशी अपेक्षा पालक वर्गाकडून अपेक्षित आहे.
पालांदूर येथील गावातील मध्यभागी गांधी चौकात असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थी वर्गाच्या प्रतीक्षेत आहे. शाळेतील शिक्षकांनी कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमाकरिता विविध मार्ग/ उपक्रम अवलंबित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता थेट घरपोच सेवा देत मोहल्ला शिक्षण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी थेट संवाद कायम ठेवलेला आहे. डिजिटल ऑनलाइन शिक्षण सुद्धा सुरूच आहे. मात्र या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरण मिळत नसल्याने त्यांचे अपेक्षित ज्ञानार्जन होत नाही. ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था सुदृढ नसल्याने प्रत्येक पालकाकडे स्मार्टफोनची सुविधा नाही.
काही पालकांकडे स्मार्टफोन असूनही कव्हरेज नसल्याने ऑनलाइन शिक्षण घडत नाही. शिक्षक वर्गांना नेमक्याच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था मिळत असल्याने मनामध्ये भेदभावाचे विचार त्रासदायक ठरत आहे. तेव्हा सर्वांना समान न्याय मिळावा याकरिता शाळा सुरू होणे गरजेचे झाले आहे.
शाळा नसल्याने विद्यार्थी वर्ग अभ्यासात रमत नाही. दिवसभर मित्रांसोबत खेळण्यात व्यस्त असतात. पालक सुद्धा आपल्या कामात व्यस्त असल्याने पाल्याकडे लक्ष द्यायला वेळ अपुरा असतो.
चौकट
जि. प. प्राथमिक शाळा पालांदूर येथील शाळेच्या संपूर्ण भिंती बोलक्या केलेल्या आहेत. विद्यार्थी वर्गांना सर्वांगीण सामान्य-ज्ञान व शालेय वातावरणाचा अभ्यास घडावा. मैदानात असतानासुद्धा विद्यार्थ्यांचे लक्ष भिंतीने आकर्षित करावे. एवढे मार्गदर्शक तत्त्वांची रेखाटने भिंतीवर अधोरेखित केले आहेत. शाळेच्या परिसरातील बगीचा हिरवागार असून दररोज पाण्याची व्यवस्था शिक्षक वर्गाकडून सुरू आहे. अशा या प्रफुल्लित वातावरणात विद्यार्थी ज्ञानार्जनाकरिता उत्साही आहेत. शासन पुरस्कृत विद्यार्थ्यांकरिता स्वाध्याय उपक्रम सुरुवात आहे.
शाळा सुरू व्हावी अशी आमची अपेक्षा आहे.
सुरेश कापसे, मुख्याध्यापक डिजिटल पब्लिक स्कूल पालांदूर.