दारूबंदी उठविली, तस्कर सैरभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 05:00 AM2021-05-29T05:00:00+5:302021-05-29T05:00:08+5:30

चंद्रपूर जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी दारूबंदी करण्यात आली होती. ही दारूबंदी सीमावर्ती जिल्ह्याच्या चांगलीच पथ्यावर पडली होती. भंडारा जिल्ह्यातूनही चंद्रपूर जिल्ह्यात दररोज दारूची खेप पोहोचवली जात होती. यात पवनी आणि लाखांदूर हे दोन सीमावर्ती तालुके आघाडीवर होते. देशी, विदेशी आणि हातभट्टीची दारू विविध मार्गाने आणि वाहनाने चंद्रपूर जिल्ह्यात खुलेआम पोहोचविली जात होती.

The embargo was lifted, the smugglers sailed | दारूबंदी उठविली, तस्कर सैरभर

दारूबंदी उठविली, तस्कर सैरभर

Next
ठळक मुद्देदररोज होती लाखाेंची उलाढाल : लाखांदूर-पवनी तालुक्यातून पोहोचत होती दारूची खेप

ज्ञानेश्वर मुंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दारू तस्करीच्या माध्यमातून दररोज लाखोंची उलाढाल करणाऱ्यांचे आता चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्याने जिल्ह्यातील दारू तस्कर सैरभर झाले आहे. सीमावर्ती पवनी आणि लाखांदूर तालुक्यातून दररोज चंद्रपूर जिल्ह्यात दारूचे पाट वाहत होते. शेकडो तरुण यात गुंतले होते. सायकलवर फिरणारे चारचाकी आलिशान वाहनाने फिरू लागले होते. महिन्याकाठी ६० ते ७० लाखांची उलाढाल यातून या दोन तालुक्यांत होती होती.  
चंद्रपूर जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी दारूबंदी करण्यात आली होती. ही दारूबंदी सीमावर्ती जिल्ह्याच्या चांगलीच पथ्यावर पडली होती. भंडारा जिल्ह्यातूनही चंद्रपूर जिल्ह्यात दररोज दारूची खेप पोहोचवली जात होती. यात पवनी आणि लाखांदूर हे दोन सीमावर्ती तालुके आघाडीवर होते. देशी, विदेशी आणि हातभट्टीची दारू विविध मार्गाने आणि वाहनाने चंद्रपूर जिल्ह्यात खुलेआम पोहोचविली जात होती. पवनी तालुक्यातून सावरला, कन्हाळगाव आणि भुयारमार्गे ही दारू चंद्रपूर जिल्ह्यात बिनदिक्कत जात होती. मांगली, आसगाव, पवनी आणि भुयार येथून देशी दारूची खेप पोहोचवली जात होती. अनेकदा पोलिसांनी कारवाई केली, परंतु दारू तस्करीला आळा मात्र बसला नव्हता. चंद्रपूर जिल्ह्यालगत असलेल्या गावातून मोहाची गावठी दारू पोहोचविली जात होती. अनेक तरुणांनी तर यासाठी खास दुचाकी तयार केली होती. 
लाखांदूर तालुकाही दारू तस्करीत मागे नव्हता. वैनगंगा नदीतीरावरील इटान, खैरणा, मोहरणा, गवराळा, टेंभरी, विहीरगाव आणि लाखांदूर येथून ही दारू चंद्रपूर जिल्ह्यातील काही गावांमध्ये पोहोचविली जात होती. अनेकदा पायी नदी पार करून किंवा डोंग्याच्या साहाय्यानेही ही दारू तस्करी होत होती. दोनही तालुक्यांतून महिन्याकाठी ५० ते ६० लाख रुपयांची उलाढाल होत होती. सहज पैसा मिळत असल्याने बेरोजगार तरुण या व्यवसायात चांगलेच गुंतले होते. पोलिसांची नाममात्र कारवाई होत असल्याने सुरुवातीला रात्री होणारी दारू तस्करी अलीकडच्या काळात दिवसाही हाेऊ लागली होती. परंतु, आता चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी शासनाने उठविल्याने या तस्करांचे कंबरडे मोडणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातच दारू मिळणार असल्याने ही दारू घेणार कोण, असा प्रश्न आहे.

दुचाकीच्या पेट्रोल टाकीतूनही दारू वाहतूक
- पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी अनेकदा विविध उपाय केले होते. गत आठवड्यात पवनी पोलिसांनी एक दुचाकी पकडली, तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला होता. पेट्रोलच्या टाकीत दारूचे पव्वे आढळून आले होते. तर, पेट्रोलची सुविधा दुसऱ्या बाजूने करण्यात आली होती, अशा अनेक दुचाक्या या व्यवसायात गुुंतल्या होत्या.

सायकलवर फिरणारे आलिशान वाहनाचे मालक
- दारू तस्करीत गुंतलेले अनेक जण आता आलिशान चारचाकी वाहनाने फिरताना दिसून येत आहे. ज्यांची सायकल घ्यायचीही ऐपत नव्हती, ते आता दुचाकी आणि चारचाकी वाहनाने फिरताना दिसत आहे. सहज पैसा उपलब्ध होत असल्याने अनेक तरुण वाईट मार्गाला लागले होते. रात्री ढाब्यावरील पार्ट्याही रंगत होत्या. गुन्हेगारी वाढल्याचे दिसत होते.

पेटीमागे एक हजाराचा फायदा
- दारू तस्करीत गुंतलेल्यांना एका पेटीमागे एक हजार रुपयांचा तत्काळ फायदा पोहाेचत असल्याची माहिती आहे. अनेक तरुण दुचाकीने दारूची खेप पोहोचवून देत होते. दारू पोहोचवली की, नगदी पैसे मिळत होते. पोलिसांचा तेवढा ससेमिरा चुकविला की, सहज पैसे मिळत होते. अनेक तरुण यातून पैसे कमावत होते. मात्र, वाममार्गाने आलेला पैसा पुन्हा त्याच मार्गाने जात होता.

आता मोर्चा वळणार  रेती तस्करीकडे 
- चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्याने दारू तस्करांना काम राहणार नाही. अल्पश्रमात पैसा कमावण्याची सवय लागल्याने ही मंडळी आता अस्वस्थ होणार आहे. रिकामे तस्कर आता रेती तस्करीत उतरण्याची दाट शक्यता आहे.  वैनगंगा नदीचे प्रसिद्ध घाट आहे. सध्या ही तस्करी सुरू आहे. परंतु, या तस्करीपेक्षा दारूत अधिक पैसा मिळत असल्याने आपला मोर्चा तिकडे वळविला होता. आता रेती तस्करीत सक्रिय होणार आहे.

 

Web Title: The embargo was lifted, the smugglers sailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.