आपातग्रस्तांचे बस्तान ‘टिन शेड’ मध्ये

By admin | Published: May 29, 2015 12:56 AM2015-05-29T00:56:08+5:302015-05-29T00:56:08+5:30

सिंदपुरी येथील आपदग्रस्त कुटूंबियांना घरकूल मंजुरीचा गुंता सुटता सुटेना झाला आहे.

In an emergency, the 'Tin Shade' | आपातग्रस्तांचे बस्तान ‘टिन शेड’ मध्ये

आपातग्रस्तांचे बस्तान ‘टिन शेड’ मध्ये

Next

रंजित चिचखेडे  चुल्हाड (सिहोरा)
सिंदपुरी येथील आपदग्रस्त कुटूंबियांना घरकूल मंजुरीचा गुंता सुटता सुटेना झाला आहे. यंदा पावसाळ्यात टिनाचे शेडमधील वास्तव्य या कुटूंबियांना जिकरीचे ठरणार आहे. या शिवाय सुविधा आणि जागेअभावी शेतकऱ्यांचे जनावरे व त्यांच्या चाऱ्यापाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे.
टिनाचे शेडमध्ये ५२ कुटूंब वास्तव्य करीत आहे. हे कुटूंब गरिब आणि असहाय आहेत. या कुटूंबियांना शासकीय घरकूल मंजूर करण्यात येत असल्याचे तुणतुणे वाजविण्यात येत आहेत. या कुटूंबियाचे पुनर्वसन होणार नाही हे आधीच झाले आहे. यामुळे घरकुल मंजूर होणार असल्याने अपेक्षा वाढल्या आहे. व्हॉटस अप आणि इंटरनेटच्या जगात आपातग्रस्त कुटूंबियांची घरकुल मजुरीची फाईल मात्र संथ गतीने धावत आहे. यामुळे या कुटूंबियांना जलद गतीने न्याय मिळत नाही, ही खरी शोकांतिका आहे. गरिबांना हक्काचा आधार देताना जाचक अटी सांगितल्या जात आहे. त्रुट्या पुढे करुन फाईल तथा यादीचा प्रवास सुरु झाला आहे. अप-डाऊन सुरु झाल्याने फाईलचे लचके तोडली जात आहे. अंतिम मंजुरीपर्यंत पाने गहाळ झाल्याचा अनुभव गावकऱ्यांना येणार आहे. या कुटूंबियांची घरकुल मंजुरीची फाईल कुठे आहे. या संदर्भात जबाबदार यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी छातीठोकपणे सांगत नाही. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा राज्यशासन असा एकच सुर आहे. पंरतु तब्बल एक वर्ष पूर्ण होत असतांना आपातग्रस्तांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्यात शासन आणि प्रशासनाला सपशेल अपयश आले आहे.
स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात टिनाचे शेड गेल्या वर्षात उभारण्यात आले आहे. या शेडमध्ये आपातग्रस्त कुटूंब, मुले आणि जनावरे वास्तव करित आहेत. या शेडमध्ये तट्टे लावण्यात आली असून ही आता जिर्ण झाली आहे. तट्यांना मोठी छिद्र पडली आहेत. यामुळे वास्तव्य करणे अडचणीत येत आहे. स्वच्छतेचा पुरस्कारप्राप्त शाळेच्या प्रांगणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यात दोष आपातग्रस्त कुटूंबियांचा नाही. बहुतांश शेतकरी असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. यात मात्र त्यांचे शाळेकरी मुले संकटाचा सामना करित आहेत. या शेडनजीक मोठा तलाव आहे. पावसाळयात तलाव पाण्याने तुडूंब भरला राहत असून, अन्य जागेत खातकुडे आहेत. यामुळे कुटूंबियात भिती निर्माण झाली आहे. साप व विंचवाचे सामना या कुटूबिंयाना करावे लागणार आहे.
मायबाप शासनाला या संदर्भात भयभित कुटूंबियानी अनेक पत्रव्यवहार केली आहेत. हिवाळी अधिवेशनात आश्वासनाची आठवण करुन दिली आहे. परंतु या पत्राचे साधे समाधानकारक उत्तर प्राप्त झाले नाही. यामुळे घरकुलांचा प्रश्न सुटणार किंवा नाही, असा साशंक प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी आश्वासनाची रिघ लावली आहे. पंरतु हीच हवा 'कॅश' करण्यास विरोधक मात्र मागे पडली आहेत. गावकरी व त्यांचे कुटूंब टिनाच्या शेडमध्ये वास्तव्य करित असले तरी कडक उन्हळ्यात पारा चढला असल्याने, त्याची चांगलीच लाहीलाही होत आहे. यामुळे झाडांचा आश्रय घेण्यात येत आहे. वातानुकूलीत खोलीत बसून प्रशासकीय यंत्रणा मात्र या कुटूंबियांचा तमाशा पाहत आहे. संवेदनाच बोथट झाल्याचा अनुभव आपातग्रस्त कुटूंब घेत असले तरी यंदाचा पावसाळा या कुटूंबियाना आव्हानात्मक ठरणार आहे. निवडणुकीची रणधुमाळी तथा आचार संहितेची अडचण या कुटूंबियांना घरकुल प्राप्त होवू देणार नाही. हे आता सत्य ठरणार आहे.

Web Title: In an emergency, the 'Tin Shade'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.