रोजगारासाठी क्लस्टर निर्मितीवर भर आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:25 AM2021-06-03T04:25:20+5:302021-06-03T04:25:20+5:30
सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय अंतर्गत खादी व ग्रामोद्योग आयोग व त्रिनेत्र कृषी ग्रामीण बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्या ...
सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय अंतर्गत खादी व ग्रामोद्योग आयोग व त्रिनेत्र कृषी ग्रामीण बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या भंडारा फॉरेस्ट लाख प्रोसेसिंग क्लस्टर उपक्रमांतर्गत १५ दिवसीय लाख हस्तशिल्प व उत्पादने निर्माण प्रशिक्षणाचे उद्घाटन खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते मुरमाडी येथे करण्यात आले. या प्रशिक्षणात ग्रामीण भागातील महिलांना लाखाचे दागिने आणि वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना ३६५ दिवस रोजगार मिळावा आणि आर्थिक स्वयंपूर्णता यावी, या हेतूने हे क्लस्टर तयार करण्यात आले असून धाबे टेकडी येथे सामूहिक सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. भविष्यात या केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण, उत्पादित वस्तूंची खरेदी-विक्री असे उपक्रम सुरू राहतील. उद्योग करू इच्छिणाऱ्या महिलांना संस्थेकडून वस्तू निर्मितीसाठी आवश्यक असलेली उपकरणेही पुरवण्यात येणार आहेत.
बुधवारी या उपक्रमांतर्गत १५ दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले. यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी लोकांच्या हाताला काम मिळण्यासाठी अशा क्लस्टरची खऱ्या अर्थाने गरज आहे असे सांगितले. असे क्लस्टर तयार करण्यासाठी समाजातील काही लोकांनी पुढे यावे. नैसर्गिक साधन संपत्ती विपुल प्रमाणात आहे. त्या माध्यमातून क्लस्टर तयार करून देण्याचा प्रयत्न व्हायला हवा असे सांगताना केंद्र शासन अशा पुढाकार घेणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असेही ते म्हणाले.