‘त्या’ कर्मचाऱ्याची चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:57 PM2017-11-21T23:57:14+5:302017-11-22T00:00:48+5:30
जिल्हा परिषद आरोग्य विभागात सहायक प्रशासन अधिकारी असलेल्या राजन पडारे याच्या ‘सेटिंग’ प्रकरणाची वृत्तमालिका ‘लोकमत’ने लावून धरली.
प्रशांत देसाई ।
आॅनलाईन लोकमत
भंडारा : जिल्हा परिषद आरोग्य विभागात सहायक प्रशासन अधिकारी असलेल्या राजन पडारे याच्या ‘सेटिंग’ प्रकरणाची वृत्तमालिका ‘लोकमत’ने लावून धरली. त्याची दखल मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांनी घेऊन पडारे याच्या चौकशीचे आदेश दिले. दरम्यान या विभागाच्या अधिकाऱ्यांना आज मंगळवारला चांगलेच धारेवर धरल्याचे समजते.
सहायक प्रशासन अधिकारी असलेल्या राजन पडारे याने शासकीय सेवा काळात पदाचा दुरुपयोग करून अनियमितता केल्याचा आरोप अनेक कर्मचाऱ्यांनी केला आहे. मात्र याची दखल अद्यापही कुणी घेतलेली नसल्याची शोकांतिका उघड झाली. पडारे हे मोहाडी तालुक्यातील करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात असताना त्यांच्यावर आर्थिक अनियमितता केल्याचा तर तुमसर तालुक्यातील मिटेवानी येथील जिल्हा परिषद हायस्कुल येथे कार्यरत असताना मुलींशी गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून दोन वेळेस निलंबित करण्यात आले होते.
पडारे याने जिल्हा परिषद येथे सहायक प्रशासन अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत असताना पदाचा दुरुपयोग करून अनेकांकडून ‘कामाच्या बदल्यात पैशाची मागणी’ अशी भूमिका ठेवल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या अनुषंगाने ‘लोकमत’ने वृत्तमालिका लावून धरली. याची दखल मुख्य कार्यपालन अधिकारी सूर्यवंशी यांनी घेतली. आज मंगळवारला त्यांनी सकाळच्या सत्रात आरोग्य विभागातील अधिकाºयांना बोलावून घेतले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी हजर नसल्याने अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके व सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद मोटघरे यांच्याकडून माहिती जाणून घेतल्यानंतर दोघांनाही खडेबोल सुनावल्याचे समजते.
दरम्यान या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी असलेल्या पडारे याच्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने सीईओने यांनी अहवाल मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान पडारे हे आज त्यांची बाजू मांडण्यासाठी मुख्य कार्यपालन अधिकारी सूर्यवंशी यांच्या कक्षात गेले. मात्र सूर्यवंशी यांनी पडारे यांना दारातच खडेबोल सुनावून ‘घरची तयारी करा’ असा सज्जड इशारा दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.
डीएचओ आल्यानंतर कारवाई
आरोग्य विभागातील वृत्तमालिकेने जिल्हा परिषद प्रशासन ढवळून निघाले आहे. दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी भंडारी हे शासकीय कामानिमित्त पुणे येथे गेलेले आहेत. ते मुख्यालयात नसल्याने पडारे यांच्यावरील कारवाई तुर्तास थांबली आहे. भंडारी हे बुधवारला भंडारा येथे येणार असून यानंतरच पडारे यांच्यावरील कारवाईबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही समजते. दरम्यान मागील तीन दिवसांपासून ‘लोकमत’ने या वृत्तातील कर्मचाºयाच्या नावाबाबत ‘सस्पेंस’ ठेवला होता. त्यामुळे येथील प्रत्येक विभागातील कर्मचारी एकमेकांकडे संशयाच्या नजरेने बघत होते. मात्र, आज त्या कर्मचाऱ्याच्या नावासह वृत्त प्रकाशित झाल्याने एकमेकांकडे संशयाच्या नजरेने बघणाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि सर्वत्र एकच चर्चा रंगली.
कर्मचारी असताना पत्रकारितेचा आव
पडारे हा पुर्वाश्रमीचा एका प्रादेशिक वर्तमानपत्रात ग्रामीण वार्ताहर म्हणून काम करीत होता. सध्या तो सहायक प्रशासन अधिकारी असला तरी त्याच्या दुचाकीवर आजही ‘प्रेस’ लिहिलेले आहे. यामुळे तो स्वत:ला पत्रकार असल्याचे त्याच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना सांगून धमक्याही तो देत असल्याचे आता समोर आले आहे. दरम्यान त्याच्या दुचाकीवर ‘प्रेस’ लिहिलेले असून पत्रकारिता सोडल्यानंतर त्याने ‘प्रेस’ समोर ‘एक्स’ हा शब्दप्रयोग करून तो पत्रकारिता क्षेत्रात असल्याचाच आव आणीत आहे.