कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 10:39 PM2018-09-05T22:39:46+5:302018-09-05T22:40:03+5:30
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना भेडसावत असलेल्या समस्या लवकरच निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन विभागीय आयुक्त (महसूल) यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना भेडसावत असलेल्या समस्या लवकरच निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन विभागीय आयुक्त (महसूल) यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे, जिल्हा शाखा भंडाराच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त यांची भेट घेवून कर्मचाऱ्यांच्या समस्येवर चर्चा करून मागण्यांचे निवेदन सोपविल्यानंतर ते बोलत होते. कास्ट्राईबच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांची त्यांच्या कक्षात भेट घेवून त्यांना झाडाचे रोपटे देवून त्यांचे स्वागत केले. भंडारा जिल्ह्यातील तसेच विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निवेदन सोपविले.
समस्यांमध्ये शिक्षण विभागातील विस्थापित शिक्षकांवर होत असलेल्या अन्याय दूर करण्यात यावा, आॅनलाईन शिक्षक बदली प्रकरणात विभागातील ज्या शिक्षकांनी खोटी माहिती भरली, बनावट प्रमाणपत्र भरले अशा शिक्षकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती जुन्याच शासन निर्णयाप्रमाणे करण्यात याव्यात, नवीन शासन निर्णयानुसार पदोन्नती करण्यात येवू नये, अतिआवश्यक सेवेतील आरोग्य सेविकांची रिक्त असलेली पदे सध्या एनआरएचएम अंतर्गत कार्यरत कंत्राटी आरोग्य सेविका यांना प्राधान्य देवून विनाअट त्यांना सेवाजेष्ठतेनुसार सामावून घेण्यात यावे, नागपूर विभागातील सर्वच कार्यालयातील प्रलंबित कालबद्ध पदोन्नती आश्वासीत प्रगती, योजनेची प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे आदेश सर्व विभाग प्रमुखांना देण्यात यावे यासह विविध मागण्यांचा समावेश होता.
शिष्टमंडळाला विभागीय आयुक्त संजयकुमार यांनी संघटनेची सभा लवकरच लावण्यात येईल व समस्या निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्याचे उपमहासचिव सुर्यभान हुमणे, भंडारा जिल्हा सचिव हरिश्चंद्र धांडेकर, भंडारा कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे पदाधिकारी बाबूराव गिरीपुंजे, अचल दामले, सुनिल निनावे, हरिकिशन अंबादे, सिद्धार्थ चौधरी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिलेल्या आश्वासनामुळे जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या आशा पल्लवीत झाल्या असून त्यांच्या कारवाईकडे आता कर्मचाºयांचे लक्ष लागले आहे.