सभापतींच्या भेटीने कर्मचाऱ्यांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 10:16 PM2018-02-20T22:16:58+5:302018-02-20T22:17:46+5:30
जिल्हा परिषद शिक्षण विभागातील कर्मचारी कर्तव्यावर नाममात्र राहत असल्याच्या तक्रारी शिक्षण व अर्थ समिती सभापती धनेंद्र तुरकर यांना प्राप्त झाल्या होत्या.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : जिल्हा परिषद शिक्षण विभागातील कर्मचारी कर्तव्यावर नाममात्र राहत असल्याच्या तक्रारी शिक्षण व अर्थ समिती सभापती धनेंद्र तुरकर यांना प्राप्त झाल्या होत्या. मंगळवारला दुपारी ३ वाजताच्या सुमारास तुरकर यांनी अचानक शिक्षण विभागाला भेट दिली. यावेळी अनेक कर्मचारी टेबल सोडून इतरत्र गेल्याचे आढळून आले. सभापतींच्या भेटीने येथील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
जिल्हा परिषदचा शिक्षण विभाग मागील काही दिवसांपासून अनेक प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. येथे नियमित शिक्षणाधिकारी यांचे पद नसल्याने कर्मचारीही जागेवर दिसून येत नाही. शिक्षण विभागाशी संबंधित प्रकरणासाठी दुरवरुन आलेल्या सेवानिवृत्त कर्मचारी किंवा ग्रामस्थांना येथील कर्मचाऱ्यांची तातकळत वाट बघावी लागते. अनेकांना अनेकदा आल्यापावली परतावे लागत असल्याने अनेकांना शारीरिक, मानसिक व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
अनेकदा येथील काही कर्मचारी केवळ ‘चिरीमिरी’ मिळावी या हेतूने काम घेवून आलेल्या व्यक्तीला आल्या पावली परत पाठवित असल्याच्या संतापजनक तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आल्या. मात्र या तक्रारींकडे आजपर्यंत दुर्लक्षच करण्यात आले. अशा गंभीर प्रकारामुळे शिक्षण विभागातील कारभार चव्हाट्यावर आला.
जिल्हा परिषदच्या सभापती पदांचे खांदेपालट नुकतेच झाले. शिक्षण सभापती म्हणून धनेंद्र तुरकर यांनी प्रभार सांभाळला आहे. त्यांनी शिक्षण विभागातील अनागोंदी कारभाराची दखल घेतली असून मंगळवारला दुपारी ३ वाजताच्या सुमारास जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर, जि.प. सदस्य प्रेरणा उमेश तुरकर, गिता राजु माटे, उत्तम कळपाते यांच्यासह प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात आकस्मित भेट दिली. यावेळी काही कर्मचारी कर्तव्य बजावत असल्याचे आढळून आले. काही कर्मचारी रजेवर असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. तर काही कर्मचारी कक्षाबाहेर गेल्याचा गंभीर प्रकारही आढळून आला. बाहेर गेलेल्या कर्मचाऱ्यांबाबद माहिती घेतली असता त्यांची हलचल रजिस्टरमध्येही नोंद आढळून आली नसल्याने या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर यांनी शिक्षणाधिकारी यांना दिल्याचे समजते. कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फोनच्या संदेशाने कर्मचारी हजर
शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर यांनी शिक्षण विभागात भेट दिली असून ते कक्षाबाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती घेत असल्याचा संदेश तेथे उपस्थित असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांनी बाहेर गेलेल्या कर्मचाऱ्यांना पाठविला. काहींनी मोबाईल व्हॅटस्अॅपद्वारे संदेश पाठविला तर काहींनी फोन करुन त्यांच्या सहकाऱ्यांना कारवाईतून वाचविण्यासाठी तातडीने कक्षात येण्याचा सुचना दिल्या. सभापतींच्या या भेटीने येथील कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.
कर्मचाऱ्यांना दिलेल्या मध्यान्ह रजेच्या शासकीय वेळेतच कक्षाबाहेर जावे. कर्तव्यावर उपस्थित राहून आलेल्या व्यक्तींचे कामे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता करावी, यात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही.
- धनेंद्र तुरकर, सभापती
शिक्षण व अर्थ समिती जि.प. भंडारा