कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 01:28 AM2018-04-12T01:28:26+5:302018-04-12T01:28:26+5:30
जिल्हाभरात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना ११ ऐवजी सहा महिन्यांच्या पुनर्नियुक्ती आदेश देण्याच्या प्रक्रियेला विरोध करून जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर बुधवारला कामबंद आंदोलन पुकारले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हाभरात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना ११ ऐवजी सहा महिन्यांच्या पुनर्नियुक्ती आदेश देण्याच्या प्रक्रियेला विरोध करून जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर बुधवारला कामबंद आंदोलन पुकारले आहे. मागण्या मान्य होईस्तोवर कामबंद ठेवण्याचा निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी महासंघाच्या भंडारा शाखेने घेतला आहे.
आरोग्य सेवा व संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्तांनी राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना पुढील पुनर्नियुक्तीचा आदेश केवळ सहा महिन्यांचे देण्यात यावे व पुनर्नियुक्ती आदेश देण्याकरिता कामावर आधारीत गुणानुक्रमाचा वापर करण्यात यावा, असे आदेश निर्गमीत केले आहे. हा प्रकार अनेक वर्षांापासून सेवा देणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे बुधवारपासून जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे देऊन कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात सहाशे कंत्राटी कर्मचारी असून हे सगळे अधिकारी कर्मचारी आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात संघटित होऊन आंदोलनात सहभागी झाले आहेत.
राज्यभरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी महासंघाच्यावतीने हे आंदोलन सुरू असून भंडारा शाखेच्यावतीने जिल्हाध्यक्ष दमयंती कातुरे, उपाध्यक्ष चंदू बारई, कोषाध्यक्ष विशाल वासनिक, भारती भांडारकर, आशिष मारवाडे, विकास गभणे, डॉ.श्रीकांत आंबेकर, राजकुमार लांजेवार, मिलींद लेदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. ११ महिण्याचा पुनर्नियुक्ती आदेश देण्यात यावा, मार्क सिस्टम रद्द करण्यात यावी, कर्मचाºयांना समकक्ष पदावर (नियमित) समायोजन करण्यात यावे, समायोजन होईपर्यंत समान काम समान वेतन देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत अधिकारी व कमचाऱ्यांनी, या निर्णयाच्या विरोधात पुकारलेल्या कामबंद आंदोलनाची दखल जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. न्याय मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आंदोलकांनी त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांची भेट घेऊन आंदोलकांनी निवेदन दिले.
विविध संघटनांचा पाठिंबा
या आंदोलनाला जिल्ह्यात विविध कार्यरत संघटनानी पाठिंबा दर्शविला आहे. त्यात मॅग्मो संघटनेचे डॉ.मधुकर कुंभारे, डॉ.शंकर कैकाडे यांन, मॅग्मो आयुर्वेदिक संघटनेचे डॉ.रमेश खंडाईत, डॉ.रवी कापगते यांनी, जिल्हा परिषद समन्वय कृती समितीचे कळंबे, मारबते, डोर्लीकर, बोरकर यांनी, औषध निर्माता संघटनेचे सचिन रिनाईत यांनी, बहुजन मुक्ती मोर्चाचे मंगेश खोब्रागडे, नरेश आचला, भाकपचे हिवराज उके, कास्ट्राईब संघटनेचे सुदामे यांनी आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला.