कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढणार
By admin | Published: June 8, 2017 12:30 AM2017-06-08T00:30:46+5:302017-06-08T00:30:46+5:30
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे शाखा भंडारा यांची सभा मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांच्या कक्षात पार पडली.
सीईओंचे आश्वासन : कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची सभा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे शाखा भंडारा यांची सभा मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांच्या कक्षात पार पडली. या सभेत मुख्य कार्यपालन अधिकारी सुर्यवंशी यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढण्याचे आश्वासन कास्ट्राईब महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा परीषद कर्मचाऱ्यांच्या व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या समस्या संबंधात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात संघटनेची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत प्रतिनियुक्तीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करून त्यांना त्यांच्या मुळ पदस्थापनेवर परत पाठविण्यात यावे, लाखनी, लाखांदूर व साकोली या नक्षलग्रस्त तालुक्यातील एनएचएम कर्मचाऱ्यांच्या मानधनात तफावत असून त्यांचा थकबाकीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा. आरोग्य विभागातील आरोग्य सेवक व सेविका यांना पदोन्नती देण्यात यावी, बंधपत्रीत आरोग्य सेविका यांना पुन्हा सेवेत घेण्यासंबंधी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा, सेवानिवृत्त आरोग्य सेविका मंदा भांबोरे यांच्यावर होत असलेला अन्याय दूर करण्यात यावा,
पहेला आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.डोंगरे यांची चौकशी करण्यात यावी, जिल्हा परीषद परिसरात विजेची व्यवस्था करण्यात यावी, आरोग्य कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे दुसऱ्या व चवथ्या शनिवारला लाभ देण्यासंबंधी आरोग्य विभागाने स्वतंत्र पत्र काढावे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्या नावात शासन निर्णयाप्रमाणे बदल करण्यात येवून प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी असे संबोधावे, कर्मचाऱ्यांना जीपीएफ स्लीप देण्यात यावी, जीपीएल व डीसीपीएस निधी खात्यात मोठ्या प्रमाणात घोळ असून हिशोब जुळवावा. या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यवंशी यांनी हे प्रश्न एका महिन्यात निकाली काढण्याच्या सूचना विभागप्रमुखांना दिल्या आहेत. या सभेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मंजुषा ठवकर व विभाग प्रमुख आणि संघटनेचे उपमहासचिव सूर्यकांत हुमणे, जिल्हाध्यक्ष विनय सुदामे, जिल्हा सचिव मनिष वाहाणे, उपाध्यक्ष विनोद मेश्राम, सहसचिव विश्वनाथ नागदेवे, सदस्य प्रभू ठवकर, अतुल मेश्राम, अजय रामटेके, जिल्हा महिला अध्यक्ष रजनी वैद्य, विधी सल्लागार अॅड. विलास कानेकर, महिला सदस्या छाया ढोरे, बंधपत्रित आरोग्य सेविका मनिषा थुलकर, छाया घटारे, अहिर, गावंडे व इतर संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.