कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे वीज सुरळीत
By Admin | Published: May 23, 2016 12:41 AM2016-05-23T00:41:47+5:302016-05-23T00:41:47+5:30
एरव्ही जनतेकडून नेहमी शिव्या खाणाऱ्या विद्युत कर्मचाऱ्यांचे त्यांच्या एका कामामुळे जनतेने अभिनंदन केले.
'ब्रेकडाऊन'वर मात : पहाटेपर्यंत केले तारा जोडण्याचे कार्य
मोहाडी : एरव्ही जनतेकडून नेहमी शिव्या खाणाऱ्या विद्युत कर्मचाऱ्यांचे त्यांच्या एका कामामुळे जनतेने अभिनंदन केले. ते काम म्हणजे रात्रीच्या काळोखात साप, विंचू, चिखलाची पर्वा न करता जनतेच्या सोयीसाठी या कर्मचाऱ्यांनी रात्रभर पहाटेपर्यंत तुटलेल्या तारा जोडण्याचे केलेले कार्य होय.
कालपरवा आलेल्या जोरदार वादळाने व पावसाने मोहाडी, जांब, करडी व वरठी येथील अनेक झाडे कोसळून पडली. त्यामुळे विजेच्या तारा तुटून पडल्या तर काही झाडांच्या फांद्या विद्युत खांबावर जावून अडकल्या. यामुळे ३३ केव्ही विद्युत वाहिनीचे इन्सुलेटर फुटले, वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे इन्सुलेटरवर वाइंडींग केलेल्या तारा देखील तुटून पडल्या. यामुळे ३३ केव्ही विद्युत वाहिनीवर अर्थ फाल्ट तयार झाला. मोहाडी विद्युत उपविभागातील ३३ केव्ही मोहाडी, ३३ केव्ही जांब, ३३ केव्ही करडी फिडर ब्रेकडाऊन झाले. एकाच वेळी आलेली तिन्ही ठिकाणची आपत्ती, रात्रीची वेळ, शेतातून व जंगलातून गेलेली फिडरची लाईन अशा परिस्थितीत उपकार्यकारी अभियंता मंगेश काहाले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक अभियंता विनोद मस्के मोहाडी यांनी सहकारी कर्मचारी पिकलमुंडे, समरीत, मंगरे, शेख, गभने, माटे यांच्या मदतीने ३३ केव्ही मोहाडी वाहिनी सुरु करून कर्तव्यदक्षपणाचा परिचय दिला.
कनिष्ठ अभियंता संजय मारसिंगे यांच्याकडे तीन वितरण केंद्राचा कार्यभार असून सुद्धा त्यांनी विद्युत कर्मचारी खवसे, मराठे, राकेश मराठे, भगत, पठाण, निमकर, चोपकर यांनी ३३ केव्ही जांब फिडर सुरु केले तर, बेलपांडे, येरणे, चेतन, बोधे, गोंधुळे, शेंडे, राधेश्याम नितनवरे यांच्या मदतीने काडीकचऱ्यातून, शेतातून, साप, विंचू, वन्य प्राणी यांची तमा न बाळगता रात्रीच्या काळोखात विद्युत वाहिनीवर 'फॉल्ट' काढून ३३ केव्ही करडी फिडर सुरळीत केला. यामुळे महावितरण उपविभाग मोहाडी येथील अधिकारी अभियंते व कर्मचारी यांचे अथक परिश्रम, कर्तव्यदक्षता व परिस्थितीची जाणीव ठेवून आपुलकीने केलेल्या कामाबद्दल या विभागातील जनतेने त्यांच्या प्रती आभार व्यक्त केले आहेत. (शहर प्रतिनिधी)