पोस्टल बॅलेट पेपर न आल्याने कर्मचारी राहणार मतदानापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 11:32 AM2024-11-20T11:32:26+5:302024-11-20T11:33:24+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : तक्रार देऊनही मागणीकडे दुर्लक्ष

Employees will be deprived of voting due to non-arrival of postal ballot paper | पोस्टल बॅलेट पेपर न आल्याने कर्मचारी राहणार मतदानापासून वंचित

Employees will be deprived of voting due to non-arrival of postal ballot paper

लोकमत न्यूज नेटवर्क 
भंडारा :
निवडणूक प्रशिक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेट मतदानासाठी फॉर्म नंबर १२ भरून दिला. शेवटचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर टपाली मतपत्रिका मतदान सुरू झाले. दरम्यान, अनेकांनी बॅलेट न मिळाल्याची तक्रार जिल्हा निवडणूक विभागाकडे केली होती. तरीही व्यवस्था करण्यात आली नाही. १९ नोव्हेंबर रोजी निवडणूक कर्तव्यावर जाणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना मतदानासाठी पोस्टल बॅलेट न मिळाल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांत रोषाचे वातावरण आहे.


निवडणूक कामासाठी नियुक्त अनेक कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेट मतदानास अडचणी येत आहेत, तसेच पोस्टल बॅलेट उपलब्ध न झाल्याने मतदानापासून अनेकांना वंचित राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा भंडारा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजय कोलते यांना रविवारी दिलेल्या निवेदनातून केली होती. परंतु, अपेक्षित सुधारणा झालेली नाही त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. 


जिल्ह्यातील तुमसर, भंडारा व साकोली या तीन मतदारसंघांत नियुक्त कर्मचाऱ्यांना १९ नोव्हेंबर रोजी कर्तव्यावर जाण्यापूर्वी पोस्टल बॅलेट मिळाले नाही. त्यामुळे ते मतदानापासून वंचित आहेत. मतदानापासून वंचित कर्मचाऱ्यांकडून रोष व्यक्त होत आहे. 


"निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त कर्मचारी मतदानापासून वंचित राहण्यासाठी फॉर्म १२ न भरणे, फार्म अपुरे भरणे किंवा कागदपत्रे न जोडणे, अशी दोन कारणे महत्त्वाची असतात. मतदानासाठी फार्म भरण्याची १३ नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. ज्यांनी फॉर्म भरले व कागदपत्रे परिपूर्ण होती त्यांनी मतदान केले आहे. काहींचे बॅलेट पेपर अद्यापही पडून असून काहींनी मतदान केले नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी साकोली, तुमसर व भंडारा येथे मतदानाची सुविधा उपलब्ध केली. तसेच जेथून मतदान साहित्य वितरित करण्यात आले तिथेही मतदानाची सुविधा होती. पोस्टल बॅलेटमध्ये चुका चालत नाही. फॉर्मवर सही नसणे, अनुक्रमांक नसणे आदी कारणेही असतात. त्यामुळे फॉर्म भरताना बारकावे लक्षात घेतले पाहिजेत. ज्यामुळे अडचणी येत नाहीत."
- प्रशांत पिसाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

Web Title: Employees will be deprived of voting due to non-arrival of postal ballot paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.