नोकरभरती परीक्षा शुल्क बेरोजगारांना डोईजड; अनाथ, गरीबांनी कुठून आणावे हजार रुपये?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 04:24 PM2023-08-08T16:24:32+5:302023-08-08T16:25:44+5:30

ही बेरोजगारांची थट्टाच असल्याची नागरिकांची संतापजनक प्रतिक्रिया

Employment Examination Fee Douzed to Unemployed; Orphans, poor people from where to get thousand rupees? | नोकरभरती परीक्षा शुल्क बेरोजगारांना डोईजड; अनाथ, गरीबांनी कुठून आणावे हजार रुपये?

नोकरभरती परीक्षा शुल्क बेरोजगारांना डोईजड; अनाथ, गरीबांनी कुठून आणावे हजार रुपये?

googlenewsNext

राहुल भुतांगे

तुमसर (भंडारा) : राज्यभरात विविध विभागांची सुमारे ७५ हजार पदे भरण्यात येणार असून, भंडारा जिल्हा परिषदेमध्येही कर्मचाऱ्यांची ३२० रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र भरतीसाठी परीक्षा शुल्क एक हजार ते ९०० रुपये आकारण्यात आल्याने ही बेरोजगारांची थट्टाच असल्याची संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

राज्यातील जिल्हा परिषद भरती प्रक्रिया राबवण्याचे कंत्राट खासगी एजन्सीला देण्यात आले आहे. भंडारा जिल्हा परिषदेत ३२० पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये विविध विभागांतील पदे असून परीक्षेसाठी एक सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. सॉफ्टवेअरची कॉपी जिल्हा परिषदांना पाठवण्यात आली आहे. त्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त केली असून, या भरती प्रकियेतून खासगी एजन्सी मात्र मालामाल होणार आहे.

या परीक्षा शुल्काचा विषय विधानसभेतही गाजला होता. त्यानंतरही भरमसाठ शुल्क आकारणी कायमच असल्याने बेरोजगारांपुढे मोठा प्रश्न निर्माण होत आहे. गरीब बेरोजगार युवकांना वंचित ठेवण्याचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप होत आहे. एमपीएससीच्या ऑफलाइन परीक्षेसाठी ३०० ते ३५० रुपये शुल्क असताना ही ऑनलाइन परीक्षा असूनही येथेच जास्त शुल्क का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अनाथांवरही अन्याय

या पदभरतीत अनाथांसाठी मोजक्या जागा राखीव असल्या तरी परीक्षा शुल्कात त्यांना कोणतीही विशेष सवलत प्रदान केलेली नाही. त्यांच्यावरही या अनिवार्य शुल्काचा भार पडणार आहे. आधीच अनाथ असलेल्यांनी एवढी परीक्षा शुल्क भरण्यासाठी पैसे आणावे कुठून, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

बेरोजगार म्हणतात...

आम्ही बेरोजगारीने त्रस्त आहोत. राज्य शासनाने शुल्कातून विद्यार्थ्यांची मांडलेली लूट तत्काळ थांबवावी

- कार्तिकी देशमुख, लोभी

वाढीव परीक्षा शुल्क अन्यायकारक आहे. एका पेक्षा अधिक पदासाठी अर्ज करण्यासाठी आर्थिक कुचंबणा होणार आहे.

- पल्लवी बोरकर, आष्टी 

अ आणि ब तसेच क आणि ड गटातील शुल्कात तफावत ठेवणे ही सर्व सामान्य बेरोजगारांना डावलण्याची शासनाची खेळी आहे.

- गुलशन मेश्राम, तुमसर

पद भरती सुशिक्षित बेरोजगारांसाठी नसून परीक्षा शुल्काच्या माध्यमातून लुट करून कंत्राटदाराचे पोट भरण्यासाठी आहे.

- अश्विन देशमुख, तुमसर

Web Title: Employment Examination Fee Douzed to Unemployed; Orphans, poor people from where to get thousand rupees?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.