आयटीआय प्रशिक्षकाला ‘स्कील इंडिया’तून रोजगार
By admin | Published: September 19, 2015 12:38 AM2015-09-19T00:38:26+5:302015-09-19T00:38:26+5:30
शासकीय तथा खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या राज्यातील हजारो प्रशिक्षणार्थ्यांना ‘स्कील इंडिया’अतर्गत ...
मुंबईत आज प्राचार्यांची बैठक : केंद्राच्या सूचनेवरुन कौशल्य विकास विभागाचा पुढाकार
प्रशांत देसाई भंडारा
शासकीय तथा खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या राज्यातील हजारो प्रशिक्षणार्थ्यांना ‘स्कील इंडिया’अतर्गत शिकाऊ उमेदवारी (अप्रेंटिस) देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी, हा यामागील उद्देश असून यासाठी शनिवारला प्रधान सचिवांनी राज्यातील सर्व आयटीआय प्राचार्यांची मुंबईत बैठक बोलाविली आहे.
मागील काही वर्षात शासनाने नोकर भरती कमी केली. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातून अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बेरोजगार विद्यार्थ्यांची फौज तयार झाली आहे. पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासोबत अनेकांनी स्पर्धा परीक्षांची कास धरली. काहींनी व्यावसायिक अभ्यासक्रमाला पसंती देत व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केले. मात्र, प्रशिक्षण घेऊनही अनेक विद्यार्थ्यांना शिकाऊ (अप्रेंटीस) उमेदवारीचे प्रशिक्षण मिळाले नाही. त्यामुळे अनेक होतकरू प्रशिक्षणार्थी नोकरीपासून वंचित राहिले आहे. काहींनी व्यवसाय थाटून बेरोजगारीवर मात करण्याचा प्रयत्न केला असला तरी व्यवसायातील वाढत्या स्पर्धेमुळे त्यांना कठिण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
मागील तीन वर्षापूर्वी राज्यातील शासकीय तथा खासगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षित विद्यार्थी, विद्यार्थिनींना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी ‘स्किल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत राज्यातीलच नव्हे तर देशातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या सर्व प्रशिक्षित उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवारी उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. यात ज्या विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारीची संधी मिळाली नाही, अशा विद्यार्थ्यांचा समावेश राहणार आहे.
जिल्हास्तरावर मेळाव्यातून होणार निवड
राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांचे मेळावे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात सर्व प्रशिक्षणप्राप्त विद्यार्थ्यांना उपस्थित राहायचे आहे. विद्यार्थ्यांसह आस्थापनाचे तथा औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना बोलविण्यात येणार आहे. ज्या कंपनी किंवा कारखानदारांकडे उपलब्ध जागेच्या उपलब्धतेनुसार मेळाव्यातून निवडलेल्या उमेदवारांची निवड करून प्रशिक्षणाची संधी देण्यात येणार आहे. ही निवड १५ आॅक्टोबरपूर्वी करून यादी शासनाकडे सुपूर्द करावयाची आहे.
आयटीआय प्रशिक्षणार्थी उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. ट्रेडनुसार आस्थापनात जागा वाढविण्यात येणार आहे. उपलब्ध जागेनुसार प्रत्येकाला संधी मिळेल. शनिवारला राज्याचे कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव तथा आयुक्त संधू यांनी राज्यातील सर्व आयटीआय प्रमुखांची मुंबई येथे बैठक बोलाविली आहे.
- चंद्रशेखर राऊत,
प्राचार्य, औद्योगिक
प्रशिक्षण संस्था, भंडारा.