मनरेगातून दहा हजारांवर मजुरांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:53 PM2018-05-23T22:53:08+5:302018-05-23T22:53:25+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत साकोली तालुक्यात २०१८-१९ या वर्षात सुरु ुअसलेल्या विविध कामांतून १० हजाराहून अधिक मजुरांना रोजगार मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यात मजुरांना सर्वाधिक रोजगार साकोली तालुक्यात मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत साकोली तालुक्यात २०१८-१९ या वर्षात सुरु ुअसलेल्या विविध कामांतून १० हजाराहून अधिक मजुरांना रोजगार मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यात मजुरांना सर्वाधिक रोजगार साकोली तालुक्यात मिळाला आहे.
उन्हाळ्यात रोजगार मिळावा यासाठी केंद्र शासनाकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नागरिकांना १०० दिवस रोजगार दिला जातो. साकोली तालुक्यात असलेल्या ६५ ग्रामपंचायत स्तरावर मजुरांना नाला सरळीकरण, पांदण रस्ते, तलाव खोलीकरण, सिंचन विहिरी, भातखाचरे, घरकुल अशी विविध कामे सुरू करण्यात आलेली आहेत.
नाला सरळीकरणाच्या कामावर २९६ मजूर, पाटाची दुरूस्तीसाठी ११५० मजूर, पांदण रस्त्यासाठी ५,१०४ मजूर, तलाव खोलीकरणासाठी २,२११ मजूर, सिंचन विहिरीसाठी, भातखचरा, घरकुलाचे कामांवर १० हजार ४९२ मजूर कार्यरत आहेत.
दररोज कार्यरत मजुराच्या उपस्थितीमध्ये बदल होत असतो. साकोली तालुक्यात ११२ कामापैकी ७० कामे पूर्ण झाली असून ४२ कामे प्रगतीपथावर आहेत. यामध्ये पांदण रस्ते २६, पाटाची दुरुस्ती १३, बोडी तलाव २१, सिमेंट रस्ते २, गुरांचे गोठे १३, शेडचे गोठे २, मजगी १९, सिंचन विहिरी १, कच्ची नाली १ अशी ११२ कामे त्यापैकी ७० कामे पूर्ण व ४२ कामे प्रगतीपथावर आहेत.
६ कोटी ३८ लाख ५६ हजार ४५६ रुपये मजुरीचे वाटप करण्यात आले. त्यापैकी अकुशल कामाचे ३ कोटी ८३ लाख १३ हजार ८१९ रुपये व कुशल कामाचे २ कोटी ५५ लाख ४२ हजार ६४६ एवढी मजुरी एका महिन्यात देण्यात आली. साकोलीचे खंडविकास अधिकारी सुनिल तडस, पंचायत विस्तार अधिकारी के.डी. टेंभरे व रोजगार हमी योजनेचे समन्वयक रंजन बोरकर हे रोजगार हमीच्या कामावर लक्ष ठेऊन आहेत.
मागीलवर्षी भंडारा जिल्हा ठरला अव्वल
मागीलवर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक कामे करण्यात आली. रोजगार देणारा जिल्हा अशी ओळख या कामांमुळे राज्यात झाली होती. मागीलवर्षी पांदन रस्ते, नाला सरळीकरण आणि तलाव खोलीकरण व घरकुलाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. यावर्षी जिल्ह्यात सर्वच तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात कामे सुरू असली तरी साकोली तालुक्यात आजघडीला १० हजारांहून अधिक लोकांच्या हाताला काम मिळालेले आहे. यावर्षीही ही संख्या सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे.