बांधकाम कामगारांना रिक्तपदांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:20 PM2019-07-15T23:20:51+5:302019-07-15T23:21:58+5:30
शासनाकडून बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी कामगारांचे नोंदणी अभियान राबविले जात आहे. जिल्ह्यात कल्याणकारी महामंडळामार्फत बांधकाम स्वरूपाचे काम करणाऱ्या मजुरांना नोंदणी सहायक कामगार आयुक्तालया मार्फत बांधकाम कामगारांनी नोंदणी केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासनाकडून बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी कामगारांचे नोंदणी अभियान राबविले जात आहे. जिल्ह्यात कल्याणकारी महामंडळामार्फत बांधकाम स्वरूपाचे काम करणाऱ्या मजुरांना नोंदणी सहायक कामगार आयुक्तालया मार्फत बांधकाम कामगारांनी नोंदणी केली जात आहे. आज अखेरपर्यंत जिल्ह्यात ४५ हजार कामगारांची नोंदणी करण्यात आल्याची माहिती आहे.
शहरी भागासह ग्रामीण भागात सुलभतेने कामगारांना नोंदणी करता यावी यासाठी अनेकदा शिवसेनेच्या वतीने आंदोलने करण्यात आली. सध्या खरीप हंगाम असल्याने ग्रामीण भागातून येणाºया बांधकाम कामगारांना तासंतास रांगेत उभे राहून कामाचा खोळंबा होत होता. याचीच दखल घेत माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर कामगार अधिकाऱ्यांनी याची आंदोलनाची दखल घेत कामगारांची नोंदणी तालुकास्तरावर सुरू केली आहे. परंतु अद्यापही काही तालुक्यांमध्ये तालुकास्तरावर नोंदणीसाठी अधिकारी उदासीन असल्याने दिसून येते.
त्यामुळे रिक्त कर्मचाऱ्यांच्या पदांमुळे सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण दिवसें दिवस वाढतो आहे. सहायक कामगार आयुक्त कार्यालयांतर्गत आतापर्यंत मोठया प्रमाणात कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. परंतु काही कामगारांच्या तक्रारीची दखल घेत कामगारांनी कोणत्याही एजंटांना बळी पडू नये, असेही शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
एकाच अधिकाऱ्यांकडे सहा जिल्ह्यांचा पदभार
सहायक कामगार आयुक्त कार्यालयात कामगार अधिकारी सुविधाकार, क्लॉर्क यांची पदे रिक्त असल्याने रिक्त पदांदा अतिरिक्त कारभार इतर कर्मचाऱ्यांना सांभाळावा लागत आहे. सहायक कामगार आयुक्तांकडे देखील सहा पदभार सोपविण्यात आले असल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना सहन करावा लागत आहे. अधिकाऱ्यांना पूर्णवेळ देता येत नसल्याने इतर कर्मचारीही कामगारांना योग्य मार्गदर्शन करत नाहीत.