उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्याला अतिक्रमण भोवले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:35 AM2021-03-18T04:35:42+5:302021-03-18T04:35:42+5:30
पालांदूर अतिक्रमण सिद्ध झाल्याने ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांसह उपसरपंचाला पदावरून खाली करण्यात आले. हा प्रकार लाखनी तालुक्यातील पालांदूर जवळील देवरी ...
पालांदूर
अतिक्रमण सिद्ध झाल्याने ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांसह उपसरपंचाला पदावरून खाली करण्यात आले. हा प्रकार लाखनी तालुक्यातील पालांदूर जवळील देवरी / गोंदी येथे घडला. अपर जिल्हाधिकारी घनश्याम भुगांवकर यांनी हा आदेश पारित केला. सन २०१७ मध्ये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत थेट निवडणूक लढत रवींद्र रामचंद्र खांडेकर सायगाव, दिलीप गोपीचंद शहारे सांनगाव, ममता रामरतन रेवतकर सांनगाव, समिता शालिक शेंडे देवरी / गोंदी, वृंदा अनिल देव्हारे देवरे / गोंदी हे ग्रामपंचायत सदस्यपदी थेट जनतेतून निवडून आले होते. मात्र, यांचे अतिक्रमण सिद्ध झाल्याने त्यांना पदमुक्त करण्यात आले. याकरिता
अर्जदार मंगेश महादेव मेश्राम देवरी / गोंदी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १४ अंतर्गत गैरअर्जदार अर्थात उपसरपंच रवींद्र खांडेकर व चार सदस्य यांना ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य पदावरून अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून अपात्र घोषित करण्याबाबत अर्ज दाखल केला होता. त्यावर युक्तिवाद होऊन तपासाअंती उपसरपंच व चार सदस्य यांचे अतिक्रमण असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्यांच्यावर ग्रामपंचायत कार्यालय अधिनियम, मुंबईअंतर्गत कायदेशीर कारवाई करीत पदमुक्त करण्यात आले. अतिक्रमणाच्या कारणाने एका वेळेस एवढे पदाधिकारी पदमुक्त झाल्याने परिसरात "अतिक्रमण नको रे बाबा" असे म्हणण्याची वेळ राजकारण्यांवर आली आहे.