महामार्गावरील अतिक्रमण उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 10:00 PM2018-12-07T22:00:52+5:302018-12-07T22:01:17+5:30
राष्ट्रीय महामार्गासह शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी महामार्गावरील शंभरावर अतिक्रमण उध्वस्त करण्यात आले. तर या मोहिमेचा धसका घेत अनेक व्यवसायीकांनी आपले अतिक्रमणातील दुकान स्वत:च हटविले. महामार्ग प्राधीकरण, बांधकाम विभाग, नगरपरिषद, महसूल प्रशासन आणि पोलिसांच्या फौजफाट्याने ही मोहीम राबविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राष्ट्रीय महामार्गासह शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी महामार्गावरील शंभरावर अतिक्रमण उध्वस्त करण्यात आले. तर या मोहिमेचा धसका घेत अनेक व्यवसायीकांनी आपले अतिक्रमणातील दुकान स्वत:च हटविले. महामार्ग प्राधीकरण, बांधकाम विभाग, नगरपरिषद, महसूल प्रशासन आणि पोलिसांच्या फौजफाट्याने ही मोहीम राबविली.
भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह शहरातील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. प्रशासनाने याविरूद्ध मोहीम हाती घेतली. दोन दिवसांपासून सायकल-रिक्षावर ध्वनीक्षेपक लावून अतिक्रमण हटविण्यासंदर्भात दवंडी देण्यात आली होती.
शुक्रवारी प्रत्येक्ष अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमुर्ती चौकात प्रशासनाचा बुलडोजर पोहचला. नगरपरिषद, बांधकाम विभागाचे अधिकारी-कर्मचारी याठिकाणी बुलडोजर घेवून हजर झाले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून पोलिसांचे पथकही तैणात करण्यता आले. सकाळी १० वाजतापासून अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ झाला. दुपारपर्यंत मुजबीपर्यंत शंभरावर अतिक्रमण हटविण्यात आले. व्यवसायीकांनी अतिक्रमण हटविताना कोणताही विरोध केला नाही. उलट प्रशासनाला सहकार्य करीत असल्याचे महामार्गावरील मोहिमेत दिसून आले.
राष्ट्रीय महामार्गासोबतच शहरातही नगरपरिषदेच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात आली. शास्त्री चौकात या मोहिमेला प्रारंभ झाला. परंतु व्यवसायीकांनी रात्रीच आपले अतिक्रमण या ठिकाणावरून हटविल्याचे दिसून आले. शहरातील सुमारे ३०० अतिक्रमण नागरिकांनी स्वत:हून काढून नेल्याचे दिसत होते. तसेच अतिक्रमण हटाव पथक दिसताच अनेकांनी आपले हातगाडे व छोटे दुकाने गुंडाळून नेले. जिल्हा परिषद चौक परिसरात अनेक व्यवसायीकांनी रस्त्यालगत दुकाने थाटली आहे. त्यांनीही आपली दुकाने स्वत:हून काढण्याचे दिसत होते.
या मोहिमेत महामार्ग प्राधीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग, नगरपरिषद सहभागी झाली होती.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून जिल्हा पोलीस दलाचे ५० कर्मचारी आणि महामार्ग पोलिसांची ४० जणांचे पथक तैणात करण्यात आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, ठाणेदार सुधाकर चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, तहसीलदार अक्षय पोयाम यांनीही या मोहिमेत भाग घेतला. शहरातील अनेक रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत होते. आता आणखी दोन दिवस ही मोहीम शहरात सुरू राहणार आहे.
तीन दिवस सुरू राहणार मोहीम
भंडारा शहरात शुक्रवारी सुरू झालेली ही मोहीम तीन दिवस सुरू राहणार आहे. या दरम्यान अतिक्रमण हटविले जाणार आहे. परंतु अतिक्रमण हटविल्यानंतर त्याठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची खात्री कुणीही देत नव्हते. रस्ते मोकळे झाले असले तरी ही मोहीम शांत झाले की पुन्हा हे अतिक्रमण वाढणार हे निश्चित.
महामार्गावर अतिक्रमण अजामीनपात्र गुन्हा
राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमण करणे अजामीनपात्र गुन्हा आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास कारावासही होवू शकतो. परंतु अनेकदा लहान व्यवसायीक असल्याने प्रशासन असे टोकाचे पाऊल उचलत नाही. परिणामी अतिक्रमण वाढत जाते.