जलयुक्त शिवार योजनेला अतिक्रमण मुक्तीची जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:41 AM2017-12-25T00:41:14+5:302017-12-25T00:41:48+5:30
जलयुक्त शिवार योजना फलदायी योजना असल्याचे सिध्द झाले आहे. या योजनेमुळे अनेक तलाव, नाल्यांचे खोलीकरण झाले असून बांध-बंधाऱ्याची निर्मिती व दुरुस्ती झाल्याने सिंचनक्षमतेत वाढ झालेली आहे.
युवराज गोमासे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : जलयुक्त शिवार योजना फलदायी योजना असल्याचे सिध्द झाले आहे. या योजनेमुळे अनेक तलाव, नाल्यांचे खोलीकरण झाले असून बांध-बंधाऱ्याची निर्मिती व दुरुस्ती झाल्याने सिंचनक्षमतेत वाढ झालेली आहे. मात्र, आजही तलाव व नाले अतिक्रमणाच्या विळख्यात असून तलाव, नाले अरुंद झाल्याचे पहावयास मिळत आहे. यावर उपाय म्हणून जलयुक्त शिवार योजनांच्या अंदाजपत्रकात ७ ते १० हजारांची तरतुद अतिक्रमण निर्मुलनासाठी करावी, मोजमाप करुन अतिक्रमण काढण्याची तरतुद झाल्यास दिलासा मिळणार आहे.
राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी व अभिनव अभियानामुळे केवळ सिंचन क्षमताच वाढली नाही तर असंख्य गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार झाला. सन २०१५-२०१८ या तीन वर्षात भंडारा जिल्ह्यातील २०१ गावांपैकी १८५ गावे वॉटर न्युट्रल झाली, तर १६ गावे वॉटर न्युट्रल होण्याच्या मार्गात आहेत. विविध कामातून २७ हजार २०० हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाल्याने अभियानाची यशस्वी वाटचाल पाहायला मिळत आहेत.
एकुण ५ वर्षाचा हा अभिनव उपक्रम असून भंडारा जिल्ह्याला यामुळे मोठा फायदा झालेला असली तरी तलाव व नाल्यांची अतिक्रमण मुक्तीची मुळ समस्या मात्र, जैसे थे च आहे. आजही तलाव व नाले अतिक्रमणाच्या जोखडात शेवटचा श्वास घेत आहेत. अतिक्रमणे व शेती तयार करण्यात आल्याने तलाव मोठ्या प्रमाणात बेबंदशाही असल्याचे दिसून येते. नाले अरुंद झाल्याने पूर्वीसारखे रुंद पात्रे दिसेनासे झाले आहेत. अतिक्रमणामुळे तलाव व नाल्यांपासून पाहिजे तसा फायदा अजुनही झालेला दिसत नाही. हे गंभिर तेवढेच वास्तव्य सत्य आहे.
जलयुक्त शिवार योजनेबरोबर या समस्येवर उपाय करण्याची आवश्यकता आहे. यासाठी शासनाने या योजनेच्या अंदाजपत्रकात ७ ते १० हजारांची वाढीव तरतूदकरुन अतिक्रमण काढण्याची तलाव व नाल्यांचे मोजमाप करण्याची आवश्यकता आहे. त्या दिशेने सकारात्मक पाऊले उचलली गेल्यास जलयुक्त शिवार योजनांचा आणखी सकारात्मक परिणाम दिसायला लागेल, ऐवढे निश्चित.
यावर्षी ५६ गावांची निवड
जलयुक्त शिवार अभियानात २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील ८६ गावांची निवड झाली. विविध यंत्रणेमार्फत १३८५ कामे पूर्ण होवून सर्व गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल झाली. या कामांमुळे १६ हजार ४४० हेक्टर संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. एका पाण्यामुळे वाया जाणाºया पिकांना जलयुक्त शिवार अभियानाने नवसंजीवनी मिळाली. सन २०१६-१७ मध्ये ५९ गावांची होवून कामातून १० हजार ७५६ हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले. यातील ५९ गावांपैकी ४३ गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल झाली तर १६ गावताील कामे प्रगतीपथावर आहेत. सन २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील ५६ गावांची निवड होवून विविध यंत्रणामार्फत १३८५ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.