आरक्षित जागांवर अतिक्रमण
By admin | Published: September 14, 2015 12:27 AM2015-09-14T00:27:50+5:302015-09-14T00:27:50+5:30
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे बसेसमध्ये अंध, अपंग, पत्रकार, महिला, आमदार, खासदार व स्वातंत्र्य सैनिक यांच्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
भंडारा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे बसेसमध्ये अंध, अपंग, पत्रकार, महिला, आमदार, खासदार व स्वातंत्र्य सैनिक यांच्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. या सीटच्या मागे या जागा कुणासाठी राखीव याचा स्पष्ट उल्लेख आहे. परंतु बसचा वाहक या निर्णयाची अंमलबजावणी करीत नसल्याने अंध, अपंगांसह महिला प्रवाशांना राखीव ऐवजी रांगेत उभे राहून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे.
महामंडळाच्या प्रवासी बसमध्ये ठराविक सीट्स या राखीव आहेत. त्या सीटच्या मागे त्या कुणासाठी राखीव आहे. याचा उल्लेख आहे व ज्या सीटच्या मागे नमूद नसेल त्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत, असे समजण्यात येत असते. राज्य परिवहन महामंडळातर्फे बसमध्ये उदात्त हेतूने जागा राखीव ठेवल्या असल्या तरी वाहकाद्वारा अंमलबजावणीच होत नसल्याने महामंडळाच्या उद्देशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.
बसस्थानकावर बस येताच मिळेल ती जागा बळकावण्याची प्रवाशांची मानसिकता असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे आबालवृद्धांना डावलून तरुणतुर्क जागा मिळविण्यासाठी धडपड करतात. बसमध्ये खिडकीमधून रुमाल, दुपट्टा व कॅरीबॅग टाकून ती जागा जणू आरक्षित झाली या अविर्भावाने वावरतात. अंध, अपंग व महिलांना मात्र गर्दीतून वाट काढत जागा मिळविणे शक्य होत नाही. परिणामी महामंडळाद्वारा या प्रवाशांना त्यांची हक्काची जागा देणेदेखील कठीण होते. शासनाने विशेष सुविधा दिली असली तरी त्यांना उभे राहूनच प्रवास करावा लागतो, हेही तेवढेच सत्य आहे. याकडे शासनासह विभागीय नियंत्रकांनी लक्ष देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)