साकोलीत मंदिराचे अतिक्रमण हटविले
By admin | Published: September 15, 2015 12:33 AM2015-09-15T00:33:44+5:302015-09-15T00:33:44+5:30
येथील गडकुंभली मार्गावरील साईमंदिर व संत सोनाजी महाराज मंदिराचे अतिक्रमण जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये हटविण्यात आले.
नाभिक समाजातर्फे घटनेचा निषेध : पंचायत समितीची इमारत होणार तयार
साकोली : येथील गडकुंभली मार्गावरील साईमंदिर व संत सोनाजी महाराज मंदिराचे अतिक्रमण जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये हटविण्यात आले. ही कारवाई सकाळी ११ वाजताच्या सुमारास तहसीलदार यांच्या बंदोबस्तात पार पाडली. नाभिक समाजाने दिवसभर दुकान बंद ठेवून या घटनेचा निषेध केला.
येथील गडकुंभली रोडवर नवीन तहसील कार्यालयाचे बांधकाम वर्षभरापासून सुरु आहे. या इमारतीच्या बाजुला असलेल्या शासकीय जमिनीवर क्रांतीवीर हुतात्मा भाई कोतवाल स्मारक भूमीची जागा व त्यावर संत सेनाजी महाराज यांची मूर्ती ठेवून मंदिर तयार करण्यात आले होते. त्याच बाजुच्या जागेवर साईबाबांची मूर्ती मांडून मंदिर तयार करण्यात आले होते. या दोन्ही मंदिरात कार्यक्रम व्हायचे. महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. त्यावेळी साकोली येथील तहसील कार्यालय व पंचायत समितीची इमारत रस्त्यालगत आली. यात पंचायत समितीची इमारत बरीचशी पडली आहे. एकोडी रोडवर भाड्याच्या घरात सदर कार्यालय आहे. कार्यालय जुन्याच ठिकाणी असून गडकुंभली रोडवर तहसील कार्यालयाचे बांधकाम सुरु आहे.
त्यामुळे नवीन पंचायत समितीची वास्तू तयार करण्यासाठी प्रशासनातर्फे याच तहसील कार्यालयाच्या बाजूची जागा निश्चित करण्यात आली व तसा प्रस्ताव साकोलीवरून जिल्हाधिकारी यांचेकडे पाठविण्यात आला.
यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी सदर जागेवरील दोन्ही मंदिर पाडण्याचे आदेश दिले व या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तहसीलदार यानी पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने दोन्ही मंदिर भूईसपाट केले. यावेळी तहसीलदार शोभाराम मोटघरे, प्रभारी खंडविकास अधिकारी आर.व्ही. मेश्राम, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता पाटील, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार धुसर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
मूर्तीसह साहित्य पंचायत समितीत जमा
या दोन्ही मंदिरातील संत सेनाजी महाराज व साईबाबांची मूर्ती व लोखंडी पाईप, टीन व इतर साहित्य साकोली पंचायत समितीचे प्रभारी खंडविकास अधिकारी आर.व्ही. मेश्राम यांच्या ताब्यात देण्यात आले असून त्या सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.
तहसील कार्यालयामार्फत आठ दिवसापूर्वी पत्र देण्यात आले होते. मात्र आजच्या कार्यवाही संदर्भात सूचना देण्यात आली नाही. साकोली येथे अनेक मंदिरे सार्वजनिक जागेवर आहेत. शासनातर्फे त्या मंदिरावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र संत सेनाजी महाराज मंदिर पाडून शासनाने दुजाभाव दाखविला. या घटनेचा संघटनेमार्फत निषेध करीत आहोत.
- जगदिश सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष .
साकोली येथील पंचायत समितीची इमारत इतरत्र न बांधता जुन्याच जागी बांधण्यात यावी अशी मागणी आधीपासूनच गावकऱ्यांची असताना प्रशासनाने गावकऱ्यांना विश्वासात न घेता ही इमारत गडकुंभली रोडवर बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र ही पंचायत समितीची इमारत जुन्याच जागी बांधण्यात यावी.
- हेमंत भारद्वाज, माजी ग्रा.पं. सदस्य .