एका संघर्षाची अखेर...
By Admin | Published: January 21, 2017 12:27 AM2017-01-21T00:27:56+5:302017-01-21T00:27:56+5:30
देशात खळबळ उडवून देणाऱ्या खैरलांजी हत्याकांडातील कर्ता पुरूष भय्यालाल भोतमांगे यांचे शुक्रवारला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास नागपूर येथील रूग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
भंडारा : देशात खळबळ उडवून देणाऱ्या खैरलांजी हत्याकांडातील कर्ता पुरूष भय्यालाल भोतमांगे यांचे शुक्रवारला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास नागपूर येथील रूग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव आज शनिवारला भंडारा येथे आणल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी समाजात शोककळा पसरली आहे. मोहाडी तालुक्यातील खैरलांजी या छोट्याशा गावात भय्यालाल भोतमांगे त्यांची पत्नी सुरेखा, मुलगा रोशन व सुधीर आणि मुलगी प्रियंका असा पाच जणांचा परिवार होता.
२९ सप्टेंबर २००६ च्या रात्री खैरलांजी येथील त्यांच्या घरावर गावातील काही लोकांनी हल्ला करून भोतमांगे कुटुंबातील सुरेखा (३८), सुधीर (२२), रोशन (१८), प्रियंका (१८) यांची हत्या केली होती. या घटनेतून भय्यालाल हे एकमेव बचावले होते. या हत्याकांडाने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.
याप्रकरणाचा खटला भंडारा जलदगती न्यायालयात सुरू होता. जलदगती न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. दास यांनी २४ सप्टेंबर २००८ रोजी या प्रकरणातील सहा आरोपींना फाशीची शिक्षा तर दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. (नगर प्रतिनिधी)
भंडारा जलदगती न्यायालयाने या प्रकरणातील आठ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याला आव्हान देण्यात आले. नागपूर खंडपीठाने यातील आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे न्याय न मिळताच भोतमांगे यांना जगाचा निरोप घ्यावा लागला.
- अमृत बन्सोड, आंबेडकरी विचारवंत
भय्यालाल भोतमांगे हे मनमिळावू स्वभावाचे होते. खैरलांजी हत्याकांडानंतर ते एकाकी पडल्याने ते नेहमी चिंतेत राहायचे. दलित, शोषित समाज त्यांच्या पाठिशी होता. न्यायासाठी त्यांची धडपड सुरु होती. मात्र न्याय मिळण्यापुर्वीच त्यांचे निधन झाल्याने समाजबांधवांना हादरा बसला आहे.
- डी.एफ. कोचे, राष्ट्रीय अध्यक्ष, समता सैनिक दल.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या खैरलांजी घटनेनंतर देशातील समाजबांधव भय्यालाल यांच्या पाठिशी होता. २००६ पासून न्याय मिळविण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू होता. भय्यालाल यांच्या निधनामुळे समाज पोरका झाला असून दलित समाजाला न्याय देण्यासाठी लढा देत राहू.
- आसित बागडे, कार्याध्यक्ष रिपाई (आ) भंडारा.