पेपर देऊन आल्यावर निघाली आजोबांची अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:08 PM2018-03-12T23:08:50+5:302018-03-12T23:08:50+5:30
जन्म व मृत्यू अटळ आहे. परंतु कर्तव्य व कर्माला प्रथम प्राधान्य देऊन आलेल्या दु:खद प्रसंगाला बाजूला सारून नित्यकर्माला तुमसर येथे विद्यार्थीनी सामोरे गेली. घरी आजोबांचे पार्थिव असून तिने दहावीचा पेपर दिला.
मोहन भोयर ।
आॅनलाईन लोकमत
तुमसर : जन्म व मृत्यू अटळ आहे. परंतु कर्तव्य व कर्माला प्रथम प्राधान्य देऊन आलेल्या दु:खद प्रसंगाला बाजूला सारून नित्यकर्माला तुमसर येथे विद्यार्थीनी सामोरे गेली. घरी आजोबांचे पार्थिव असून तिने दहावीचा पेपर दिला. त्यानंतर आजोबांची अंत्ययात्रा काढण्यात आली. मृत्यूपूर्वी आजोबांनी आपल्या नातणीला परीक्षा देण्याची गळ घातली होती, हे विशेष. सदर प्रसंग तुमसर येथे सोमवारी घडला.
इंदिरा नगरात सोविंदा बुधे (८०) यांचा वृद्धापकाळाने सोमवारी पहाटे निधन झाले. सोमवारी त्यांची नात हिचा इयत्ता दहावी भूमितीचा पेपर होता. आजोबाने आपल्या नातणीला वेळोवेळी शिक्षण व अभ्यासाचे महत्व सांगितले होते. मागील काही दिवसापासून आजोबा आजारी होते. नात त्यांची सेवा सुश्रृषा करायची.
आजोबांची अत्यंत लाडाची असल्याने आजोबांच्या मृत्युमूळे ती पार खचून गेली. बालमन काय करावे ते तिला कळू देत नव्हते, परंतु आजोबांच्या संस्काराने ती कठोर झाली. घरी आजोबांचे पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन नात जनता विद्यालयातील परीक्षा केंद्रावर दाखल झाली.
तत्पूर्वी बुधे कुटुंबीयांनी सकाळी ११ वाजता अंत्ययात्रा काढण्याचा निर्णय घेतला होता. परंतु नात धनश्री हिने हंबरडा फोडला. माझ्या आल्याशिवाय आजोबांची अंत्ययात्रा काढायची नाही, असे धनश्रीने कुटुंबियांना सांगितले होते.
माजी नगरसेवक योगेश सिंनगजुडे यांनी बुधे कुटुंबियांची समजूत काढून धनश्री येईपर्यंत अंत्ययात्रेची तयारी करू. धनश्री आल्यावरच अंत्ययात्रा काढावी, अशी चर्चा करण्यात आली.
धनश्रीचा पेपर दुपारी एक वाजता संपला. ती घरी परतली. त्यानंतर आजोबांची अंत्ययात्रा काढण्यात आली. धनश्रीने साश्रृनयनांनी आजोबाला अखेरचा निरोप दिला. त्यानंतर अंत्ययात्रा काढण्यात आली. आजोबा व नात धनश्रीचे प्रेम पाहून उपस्थित नागरिकांना अश्रू आवरता आले नाही. जिवंतपणी दिलेल्या संस्काराची शिदोरी आजन्म प्रत्येकांनी जपावी, असाच मार्मिक उपदेश ही घटना देऊन गेली.