ऊर्जामंत्र्यांनी मागितली २४ तासांची मुदत
By Admin | Published: August 15, 2016 12:19 AM2016-08-15T00:19:29+5:302016-08-15T00:19:29+5:30
तालुक्यात कृषीपंपाची होणारे भारनियमन बंद करावे या मागणीसाठी तालुक्यातील शेतकरी जुलै महिन्यापासून वीज वितरण कंपनी कार्यालयाच्या पाजऱ्या झिजवित आहेत.
प्रकरण साकोली तालुक्यातील कृषीपंपांच्या भारनियमनाचे : १६ पासून शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरु होणार
साकोली : तालुक्यात कृषीपंपाची होणारे भारनियमन बंद करावे या मागणीसाठी तालुक्यातील शेतकरी जुलै महिन्यापासून वीज वितरण कंपनी कार्यालयाच्या पाजऱ्या झिजवित आहेत. मात्र यावर तोडगा न निघाल्यामुळे आज तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली व समस्या सांगितली. यावर उर्जामंत्र्यांनी २४ तासाची मुदत मागून दि. १६ ला यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले.
जोपर्यंत भारनियमन बंद होणार नाही तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरुच राहणार असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला असून दि. १६ पासून वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर शेतकरी धरणे आंदोलनाला सुरुवात करणार आहेत.
यंदा शेतीसाठी अपेक्षीत पाऊस पडला नाही तरीही शेतकऱ्यांनी जसे जमेल तसे शेती केली तर काही शेतकऱ्यांची रोवणी आताही शिल्लक आहे. परिणामी पावसाअभावी धानाला पाणी होऊ शकत नाही. तर ज्या शेतकऱ्यांकडे विहिर व बोअरवेल आहे अशा शेतकऱ्यांमुळे भारनियमनाचे संकट आहे. यावर्षी उन्हाळ्यापासून कृषीपंपाला फक्त आठ तासच वीज पुरवठा मिळत आहे. त्यामुळे शेतीला पाणी पुरत नाही. त्यामुळे धान जगवायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे हे भारनियमन बंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. यासाठी तालुक्यातील शेतकरी मागील दोन महिन्यापासून वीज वितरण कंपनीच्या चकरा मारीत आहेत. मात्र त्याचा काही एक उपयोग झाला नाही. आज सकाळी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नागपूर येथे भेट घेतली व भारनियमनाचे विरोधात चर्चा करून भारनियमन बंद करा अशी मागणी केली. यावर उर्जामंत्री बावनकुळे यांनी या शेतकऱ्यांना २४ तासाची मुदत देवून दि. १६ ला नागपूर येथे खासदार नाना पटोले, आ.बाळा काशीवार, आ.चरण वाघमारे, आ.अॅड.अवसरे, वीज वितरण कंपनीचे अधिकारी व शेतकऱ्यांचे शिष्टमंडळाला नागपूर येथे बोलाविल आहे. या बैठकीत या भारनियमनावर तोडगा काढू असे आश्वासन दिले आहे.पूर्वनियोजित दि. १६ पासूनचा धरणे आंदोलनाचा पवित्रा मात्र कायम ठेवला आहे. उर्जामंत्र्यांशी चर्चा करताना अविनाश ब्राम्हणकर, अशोक कापगते, नंदू समरीत, मदन रामटेके, बाबू बनकर, सुरेशसिंह बघेल, शालीकराम आसटकर, अंताराम खोटेले, केवळराम लांजेवार, जागेश्वर कापगते, सुधीर गोबाडे, नामदेव टेंभुर्णे सुखदेव इलमकर, अशोक बोरकर, नेतराम गहाणे, वसंता लांजेवार,अनिल खोटेले उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)