कालव्यावर फिरायला गेले, अन् अभियंता बेपत्ता झाले!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 11:17 AM2023-07-07T11:17:35+5:302023-07-07T11:18:05+5:30
गोसेखुर्दच्या कालव्यावर सापडले कपडे, मोबाईल आणि दुचाकी
पवनी (भंडारा) : येथील भाई तलाव वॉर्डातील रहिवासी असलेले अभियंता तेजराम किसन राखडे (५७) यांच्या अचानकपणे रहस्यमयरित्या बेपत्ता होण्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचे कपडे, मोबाइल, पाण्याची बाटली आणि दुचाकी कालव्याच्या काठावर सापडली. मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने त्यांच्या बेपत्ता होण्यामुळे अनेक तर्कवितर्कांना ऊत आला आहे.
बुधवारी, ५ जूनला सायंकाळी ६ वाजता ते नेहमीप्रमाणे गोसीखुर्द उजव्या कालव्याच्या बाजूने फिरायला गेले होते. मात्र, रात्र उलटूनही घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध केली. गुरुवारी उजव्या कालव्याच्या बाजूला त्यांनी नेलेली स्कुटी, त्यांच्या अंगातील शर्ट-पँट, मोबाइल व पाणी बाटली व्यवस्थित ठेवलेले आढळले.
राखडे हे पट्टीचे पोहणारे होते. कालव्याकडे फिरायला गेल्यावर ते त्यात पोहायचे. सध्या कालव्याला पाणी सोडल्याने ते पोहण्यासाठी पाण्यात उतरले असावेत व दरम्यान दूरपर्यंत वाहून गेले असावेत, अशी शंका आहे. मात्र, ते पट्टीचे पोहणारे असल्याने वाहून जातील, यावर कुणाचाही विश्वास नाही.
वनाधिकाऱ्यांनी जंगलात घेतला शोध
कालव्याच्या बाजूला अभयारण्य असल्याने हिंस्त्र प्राण्याने हल्ला केला असावा, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. या संशयावरून वन विभागाचे अधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी परिसर पिंजून काढला. पण पग मार्क किंवा कोणतेही सबळ पुरावे मिळाले नाहीत. कालव्याचे सोडलेले पाणी कमी करून शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच कालव्याच्या आजूबाजूला जंगलव्याप्त क्षेत्रात शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत शोध लागू शकला नाही. यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्यामुळे संशयाचे वलय निर्माण झाले आहे.