केबलवरील मनोरंजन महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 09:35 PM2019-02-12T21:35:00+5:302019-02-12T21:35:22+5:30

ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनल निवडण्याची संधी मिळाली. मात्र ही संधी नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारी ठरू पाहत आहे. २०० ते २५० रुपये महिना शुल्क भरून अहोरात्र मनोरंजन करून घेणाऱ्यांना आता कमीत कमी ३०० ते ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथोरीटी आॅफ इंडियाने पे चॅनलची प्रभावी अंमलबजावणी सुरु केल्याने ग्राहकांना केबल आॅपरेटरकडे धाव घ्यावी लागत आहे.

Entertainment on cable expensive | केबलवरील मनोरंजन महागले

केबलवरील मनोरंजन महागले

Next
ठळक मुद्देअनेकांचा हिरमोड : ट्रायच्या नियमांची शहरी व ग्रामीण भागात अंमलबजावणी

संजय साठवणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनल निवडण्याची संधी मिळाली. मात्र ही संधी नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारी ठरू पाहत आहे. २०० ते २५० रुपये महिना शुल्क भरून अहोरात्र मनोरंजन करून घेणाऱ्यांना आता कमीत कमी ३०० ते ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथोरीटी आॅफ इंडियाने पे चॅनलची प्रभावी अंमलबजावणी सुरु केल्याने ग्राहकांना केबल आॅपरेटरकडे धाव घ्यावी लागत आहे.
दूरचित्र वाहिण्यांवरून अहोरात्र बातम्या, चित्रपट, माहितीपूर्ण कार्यक्रम आणि मालिका सुरु असतात. प्रत्येकाच्या घरी केबल अथवा डीश अँटीना द्वारे कनेक्शन घेतलेले आहेत. यासाठी आतापर्यंत साधारणत: २०० ते २५० रुपये महिन्याला शुल्क भरावे लागत होते. परंतु ट्रायने १ फेब्रुवारीपासून ग्राहकांना आपले आवडते चॅनल निवडण्याची संधी दिली. मात्र ग्राहकांनी आपल्या आवडीचे चॅनल निवडल्यानंतर शुल्क पाहून डोळे पांढरे करण्याची वेळ आली. मनोरंजनासाठी कमीत कमी पैसा खर्च करण्याची ग्राहकांची मानसिकता असते. पूर्वी अ‍ॅनालॉक चॅनल पाहताना ग्राहकांना केवळ १०० रुपये खर्च करावे लागत होते. त्यानंतर सेट अप बॉक्सने सर्वांना डिजीटल प्रणालीची भुरळ घातली. मात्र केबल भाडे १०० वरून २०० ते २५० रुपये झाले. पूर्वीपेक्षा चॅनलची संख्या वाढल्याने कुणाची तक्रारही नव्हती.
आता मात्र ट्रायच्या नवीन प्रणालीमुळे केबल भाडे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधीकरणाने लागू केलेल्या नवीन प्रणालीची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांनी केबल आॅपरेटरकडे धाव घेतली आहे. फ्री टू इयर १०० चॅनलसाठी ग्राहकांना १३० रुपये मोजावे लागणार आहे. याव्यतिरिक्त पे चॅनलसाठी वेगवेगळी रक्कम ग्राहकांना मोजावी लागेल. त्यात जीएसटी १८ टक्के राहणार आहे. म्हणजे घरातील दूरचित्रवाणीवरील मनोरंजन ३०० ते ४०० रुपयांच्या घरात जाणार आहे. आता या वाढत्या किमतीमुळे ग्राहकात चांगलाच असंतोष पसरला आहे. काही जण जिल्हा प्रशासनाकडे दाद मागणार असल्याची माहिती आहे. साकोली शहरात हजारो ग्राहक असून आता या ग्राहकांना नाहक फटका सहन करावा लागणार आहे.

दूरचित्रवाणीवरील मनोरंजन आता पूर्वीपेक्षा महाग झाले आहे. सर्वसामान्यांना हा खर्च आवाक्याबाहेर आहे. पूर्वीप्रमाणेच दर करण्याची मागणी शासनाकडे करणार आहोत.
-हेमकृष्ण वाडीभस्मे, ग्राहक, साकोली.
ग्राहकांकडून अर्ज भरून त्यांना आवडेल ते चॅनल दिले जात आहे. मात्र दरात वाढ झाल्याने ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
-नितीन खेडीकर, केबल आॅपरेटर, साकोली.

Web Title: Entertainment on cable expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.