करमणूक कर विभाग होणार इतिहासजमा!
By admin | Published: January 19, 2017 12:22 AM2017-01-19T00:22:25+5:302017-01-19T00:22:25+5:30
वर्षानुवर्षे कोट्यवधींचा करमणूक कर वसूल करणारा जिल्हा प्रशासनाचा करमणूक कर विभाग लवकरच बंद होणार आहे.
अधिकारी, कर्मचाऱ्यांचे समायोजन होणार : नऊ महिन्यांत ७९.३४ लाखांची वसुली
देवानंद नंदेश्वर भंडारा
वर्षानुवर्षे कोट्यवधींचा करमणूक कर वसूल करणारा जिल्हा प्रशासनाचा करमणूक कर विभाग लवकरच बंद होणार आहे. या कराचा अंतर्भाव वस्तू व सेवा करामध्ये (जीएसटी) होणार असल्याने एप्रिल २०१७ पासून करमणूक करवसुली सेल्स टॅक्स (विक्रीकर) विभागाकडून केली जाणार आहे. त्यामुळे करमणूक कर विभाग इतिहासजमा होणार आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास ४२० अधिकारी कर्मचाऱ्यांचे इतर विभागात समायोजन करण्यात येण्याची शक्यता आहे.
जिल्हा प्रशासनाने महसूल वसुलीवर लक्ष केंद्रीत केले आहे. करमणूक कराच्या माध्यमातून केबल जोडणी, चित्रपटगृह तसेच विविध करमणूक कराच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने अवघ्या नऊ महिन्यात ७९ लाख ३४ हजार रुपयांची वसुली केली आहे.
जिल्हा प्रशासनाने जमिन, गौण खनिज तसेच करमणूक कराच्या स्वरुपात कराची वसुली केली जात असते. गौण खनिज व महसूल करापाठोपाठ करमणुकीवर आकारल्या जाणाऱ्या कराची रक्कम ही मोठी असते. या विभागाने नऊ महिन्यात करमणूक करापोटी ७९ लाख ३४ हजार रुपयांची वसुली केली आहे. जिल्ह्यात यावर्षी १ कोटी ४० लाख रुपयांच्या करमणूक कर वसुलीचे उद्दिष्ट होते.
मात्र, यावर्षी करमणूक कर विभागाची ५६.६७ टक्के वसुली झाली. येत्या तीन महिन्यात उद्दीष्टे पुर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची धडपड सुरु आहे. करमणूक कर विभागाकडून चित्रपटगृह, फिरते चित्रपटगृह, व्हिडीओ सिनेमा, केबल, डीटीएच, व्हिडीओ गेम व इतर वसुली अशा सात प्रकारे करमणूक कराची वसुली केली जाते.
जिल्ह्यात ८० केबल आॅपरेटर, ५ चित्रपटगृह, १२ व्हिडीयो पार्लर, १८ हजार २३० डीटीएच जोडण्या, १९ हजार ३०४ केबल जोडण्या आहेत. या माध्यमातूनच संबंधित विभागाला कराची प्राप्ती होत असते.
जिल्ह्यात १९ हजार ३०४ केबल ग्राहक
जिल्ह्यातील १९ हजार ३०४ केबल ग्राहकांकडून कर गोळा करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येचा विचार करता, जिल्ह्यात केवळ १९ हजार ३०४ केबल जोडण्या असल्याची नोंद करमणूक कर विभागाकडे आहे. यात भंडारा तालुक्यात ९,५४०, पवनी २,२४०, तुमसर २,२१६, मोहाडी २,७१६, साकोली ५९६, लाखनी १,९९९ केबल ग्राहकांची संख्या आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे सर्वेक्षणाला मर्यादा येत आहेत. यामुळे केबल जोडण्याची खरी संख्या निश्चित होत नाही. सेट टॉप बॉक्सची सक्ती आल्यामुळे यापुढे आता नेमक्या जोडण्या स्पष्ट होतील.
सेट टॉप बॉक्स फेज ३ अंतर्गत ३१ जानेवारीपर्यत आणि ग्रामीण भागात फेस ४ अंतर्गत ३१ मार्चपर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. करमणूक कर विभागाच्या वतीने नियमित पाहणी करुन शासनाचा महसूल वाढविण्यात आटोकाट प्रयत्न केला जातो.
- डी. व्ही. पाथोडे,
करमणूक कर निरीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा