लसीकरणात ज्येष्ठांपेक्षा तरुणांमध्ये उत्साह अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:37 AM2021-04-09T04:37:36+5:302021-04-09T04:37:36+5:30
भंडारा : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असताना त्याच जोमाने लसीकरणही सुरू आहे. मात्र, लसीकरणाच्या वयोगटात ज्येष्ठांपेक्षा तरुणांमध्ये लस ...
भंडारा : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असताना त्याच जोमाने लसीकरणही सुरू आहे. मात्र, लसीकरणाच्या वयोगटात ज्येष्ठांपेक्षा तरुणांमध्ये लस टोचून घेण्यात उत्साह अधिक दिसून येत आहे. ४५ ते ६० या वयोगटात आतापर्यंत ३६ हजार ४०२ नागरिकांनी तर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांमध्ये ३१ हजार ३२३ गुणांनी लस घेतली आहे.
जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर अनेक शंका-कुशंका व्यक्त करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर हळूहळू का होईना लसीकरणात उत्साह वाढत गेला. १ मार्चपासून ४५ वर्षांवरील वयोगटातून लसीकरणात पहिल्या डोजमध्ये ३६ हजार ३९१ नागरिकांना देण्यात आली. तर दुसरा डोजमध्ये ७ एप्रिलपर्यंत ३११ जणांना लस देण्यात आली. ६० वर्षांवरील वयोगटांमध्ये पहिल्या अंतर्गत ३० हजार २४१ ज्येष्ठांना लस देण्यात आली. दुसऱ्या डोजमध्ये १०८२ नागरिकांनी घेतली आहे.
जिल्ह्यातील २० केंद्रांवर लसीकरणाचे कार्य सुरू आहे. विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यात १८४ ठिकाणी लसीकरण करण्यात येत होते. मात्र, अनेक बाबींमुळे बहुतांश केंद्रात लसीकरण बंद आहे. दरम्यान पुन्हा जोमाने वितरण केंद्र सुरू करून अधिकाधिक नागरिकांना त्रास देण्याचा मानही शासनाने व्यक्त केला आहे.
बॉक्स
भंडारा तालुका आघाडीवर
लसीकरणअंतर्गत भंडारा तालुक्यात दोन्ही वयोगटात आतापर्यंत ८ हजार २६९ नागरिकांना डोस देण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ तुमसर तालुक्याचा क्रमांक लागतो. तुमसर तालुक्यात ८०७० एवढ्या नागरिकांना डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर लाखनी, पवनी, मोहाडी व लाखांदूर तालुक्याचा क्रमांक लागतो. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आतापर्यंत ४५ हजार ५०२ नागरिकांना डोस देण्यात आल्याची माहिती आहे.
बॉक्स
ग्रामीण भागात संथगती
लॉकडाऊन परिस्थिती असली तरी ग्रामीण क्षेत्रात लसीकरणासाठी हव्या तेवढ्या प्रमाणात उत्साह दिसून येत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले असले तरी उपकेंद्रातील लसीकरणाची गती मात्र संथ दिसून येते. एका उपकेंद्राला तीन ते चार गावांत जोडले असल्याने नागरिक तीन ते चार किलोमीटरचे अंतर जाण्यास पसंत करीत नाही. त्याचाच परिणाम लसीकरणावर जाणवत असल्याचे प्रथम दृष्ट्यासमोर येत आहे.
कोट बॉक्स
लॉकडाऊन सुरू असले तरी त्याचा कुठेही विपरीत परिणाम लसीकरणावर जाणवलेला नाही. नागरिकांनी लसीकरणासाठी समोर यावे.
-डॉ. प्रशांत उईके, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा.