जप्त रेतीसाठा परिसरात प्रवेशबंदी
By admin | Published: October 10, 2015 01:01 AM2015-10-10T01:01:05+5:302015-10-10T01:01:05+5:30
जिल्ह्यातील रेतीघाटातून वाळू उचल करण्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपुष्टात आली आहे.
पवनी : जिल्ह्यातील रेतीघाटातून वाळू उचल करण्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपुष्टात आली आहे. दरम्यान रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी पवनी व आजूबाजूच्या परिसरातून १,८०० ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेला रेतीसाठा ठेवण्यात आलेल्या ठिकाणाहून रेती चोरी होऊ नये यासाठी, त्या ठिकाणाच्या २०० मीटर परिसरात पवनी तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी एम.यु. वाकलेकर यांनी पवनी तालुक्यात कलम १४४ लागू केले आहे.
गुडेगाव येथील गंगाराम कांबळे यांच्या गट क्र. २१७ वर १,८०० ब्रास रेतीसाठा ठेवलेला आहे. जप्त करण्यात आलेल्या ठिकाणाच्या २०० मीटर अंतर परिसरात कोणत्याही प्रकारे ट्रॅक्टर, ट्रक, जेसीपी किंवा इतर रेती वाहतुकीचे साधन वापरता येणार नाही. रेती, माती, मुरुम, दगड याप्रकारचे कोणतेही गौण खनिज अवैधरित्या वाहतुक करता येणार नाही. सदर अधिसूचना सन २०१५-१६ या वर्षातील रेतीघाटांचा लिलाव होईपर्यंत राहणार आहे. (तालुका प्रतिनिधी)