एकाच दिवशी चार वन्यजिवांच्या मृत्यूने हळहळले पर्यावरणप्रेमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:35 AM2021-05-13T04:35:41+5:302021-05-13T04:35:41+5:30

भंडारा : निसर्गाच्या मुक्त वातावरणात नुकतेच पाऊल ठेवलेल्या वाघांच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाला. त्या पाठोपाठ एका अस्वलाचाही मृतदेह जंगलात ...

Environmentalists shocked by the death of four wildlife on the same day | एकाच दिवशी चार वन्यजिवांच्या मृत्यूने हळहळले पर्यावरणप्रेमी

एकाच दिवशी चार वन्यजिवांच्या मृत्यूने हळहळले पर्यावरणप्रेमी

Next

भंडारा : निसर्गाच्या मुक्त वातावरणात नुकतेच पाऊल ठेवलेल्या वाघांच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाला. त्या पाठोपाठ एका अस्वलाचाही मृतदेह जंगलात आढळला. एकाच दिवशी चार वन्यजिवांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी हळहळताना दिसत होते. वनविभागाने या चारही वन्यजिवांचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार केले. जिल्ह्याच्या इतिहासाहात एकाच दिवशी चार वन्यजिवांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना असावी.

भंडारा तालुक्यातील बासोरा येथील आशीष खुशाल हलमारे यांना गराडाजवळील टेकेपार कालव्याच्या सायफन टाक्यात वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत दिसले. त्यांनी तत्काळ बीट रक्षक मनोहर कोटेवार यांना सांगितले. त्यांनी ही माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर यांना दिली. भंडारा वनपरिक्षेत्रातील दवडीपार उपवनक्षेत्रांतर्गत गराडा नियतन क्षेत्रातील कक्ष क्रमांक १७८ संरक्षित वनात वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत होते. मंगळवारच्या रात्री दोन्ही बछडे सायफन टाक्यात बुडून मृत्युमुखी पडले असावेत, असा अंदाज आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीनुसार पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. गुणवंत भडके व डाॅ. हटवार यांनी शवविच्छेदन केले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे असिस्टंट इन्स्पेक्टर जनरल हेमंत कामडी यांच्या परवानगीने मानद वन्यजीव नदीम खान व शाहीद खान, उपवनसंरक्षक एस. बी. भलावी, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी साकेत शेंडे यांच्या समक्ष शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक अहवालानुसार पाण्यात बुडून बछड्यांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले.

दुसरी घटना पवनी तालुक्यातील सावरला सहवनक्षेत्र, नियत क्षेत्र गुडेगावमध्ये घडली. एक महिन्याच्या पेक्षा कमी वयाचा बछडा तेथे मृतावस्थेत आढळला. यासोबतच भंडारा वनपरिक्षेत्रातील दवडीपार उपवन क्षेत्रांतर्गत कक्ष क्रमांक २८६ वाघबोडी गावाजवळ २० वर्षे वयाचे अस्वल मृतावस्थेत आढळून आले. या अस्वलाचा मृत्यू घोणस सापाच्या दंशाने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

भंडारा जिल्हा निसर्गसंपन्न आहे. मोठ्या प्रमाणात वन्यजीव येथे मुक्त संचार करतात. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी वन्यजिवांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करतात. यामुळेच येथे वन्यजीव मोठ्या प्रमाणात वावरताना दिसून येतात. अलीकडे वाघाचा संचारही वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी बेला कोरंभी मार्गावर वाघाचे पगमार्क आढळून आले होते. आता गराडा परिसरातही वाघ असल्याचे या घटनेने सिद्ध झाले आहे. या मादी वाघिणीचा शोध घेण्यासाठी गराडा परिसरात वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. जिल्ह्यात एकाच दिवशी चार वन्यजिवांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची माहिती जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. वन्यजीवप्रेमींसह सर्वसामान्य नागरिकही हळहळ करताना दिसत होते. एका दिवशी चारजणांच्या मृत्यूची ही पहिलीच घटना असावी.

..तर दोन बछड्यांचा जीव वाचला असता

आपल्या आईसोबत हे दोन बछडे भटकंती करीत असताना टेकेपार सिंचन प्रकल्पाच्या कालव्यातील सायफन टाक्यात बुडून मृत्युमुखी पडले. विशेष म्हणजे या सायफन टाक्यावर संरक्षणाच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. या सायफन टाक्यावर जाळी जरी लावली असती तरी या दोन निष्पाप जिवांचा प्राण वाचला असता. वन्यप्राणी या टाक्यात पुन्हा पडू नये म्हणून संरक्षणाच्या दृष्टीने ताबडतोब उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच सुरक्षा व्यवस्था का केली नाही याबाबत भंडारा लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनाही विचारणा करण्यात आली आहे. कालव्याच्या बाजूला असलेले सायफन टाक्या अनेकदा वन्यजिवांसाठी धोक्याची घंटा ठरतात.

Web Title: Environmentalists shocked by the death of four wildlife on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.