इटियाडोह सिंचन क्षेत्रातील रोवणी लांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:22 AM2021-07-05T04:22:19+5:302021-07-05T04:22:19+5:30

लाखांदूर : पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया व गडचिरोली आदी तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जलसिंचन सुविधा उपलब्ध करणाऱ्या इटियाडोह धरणात सध्या ...

The erosion of the Etiadoh Irrigation Area will be prolonged | इटियाडोह सिंचन क्षेत्रातील रोवणी लांबणार

इटियाडोह सिंचन क्षेत्रातील रोवणी लांबणार

Next

लाखांदूर : पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया व गडचिरोली आदी तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जलसिंचन सुविधा उपलब्ध करणाऱ्या इटियाडोह धरणात सध्या केवळ २०.४० टक्के जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. सदर जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत सरासरीपेक्षा १३ टक्क्यांनी कमी असल्याने यंदाच्या खरिपातील इटियाडोह सिंचन क्षेत्रातील धान रोवणी लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

माहितीनुसार, पूर्व विदर्भातील इटियाडोह धरण अंतर्गत भंडारा, गोंदिया व गडचिरोली या तीन जिल्ह्यातील लाखांदूर, अर्जुनी,वडसा व आरमोरी आदी चार तालुक्यात सिंचन सुविधा उपलब्ध केली जात आहे. बाघ इटियाडोह विभागांतर्गत कालव्यांद्वारे शेतकऱ्यांना सदर सिंचन सुविधा उपलब्ध होण्यासाठी या विभागांतर्गत एकूण ५५ पाणी वापर संस्था कार्यरत आहेत. या संस्थांतर्गत लाभक्षेत्रातील चारही तालुक्यातील जवळ पास १०८ गावातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधेचा लाभ दिला जात आहे. यंदा खरीप हंगामात पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने अद्याप या धरणातील जलसाठ्यात वाढ झाली नसल्याची माहिती आहे. गतवर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीला या धरणात ३१.२५ टक्के इतका जलसाठा उपलब्ध झाला होता. यंदा मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला केवळ २०.४० टक्के जलसाठा असून सरासरी साठ्यापेक्षा खूप कमी असल्याने या लाभ क्षेत्रातील धान पीक रोवणी लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या धरणांतर्गत भंडारा, गोंदिया व गडचिरोली या तीन जिल्ह्यातील एकूण १७ हजार ६०८ हेक्टर क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध होत असतांना केवळ धरणातील पर्याप्त जलसाठ्याअभावी यंदा रोवणी लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लाखांदूर तालुक्यात या धरणांतर्गत केवळ ४ हजार ७६६ हेक्टर क्षेत्र सिंचित केले जात असून तालुक्यातील उर्वरित क्षेत्रात शेतकरी कृषी वीज पंपाद्वारे सिंचन सुविधा उपलब्ध करीत असल्याने तालुक्यातील काही भागात यंदाच्या खरिपातील धान रोवणीला प्रारंभ करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

अद्याप कालव्यांना पाणी नाही

यंदाच्या खरिपात आतापर्यंत कमी स्वरूपात पाऊस झाल्याने इटियाडोह धरणात केवळ २०.४० टक्केच जलसाठा झाला आहे. या धरणांतर्गत सिंचनासाठी कालव्यांना पाणी सोडण्याकरिता ३३ टक्के जलसाठा असणे आवश्यक आहे. या धरणात यंदाच्या पावसाळ्यात कमी स्वरूपात झालेल्या पावसाने ३० टक्के जलसाठा न झाल्याने अद्याप कालव्यांना पाणी न सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. कालव्यांना पाणी सोडण्यात आल्यास लाखांदूर तालुक्यातील २२ गावांना खरिपात सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे.

Web Title: The erosion of the Etiadoh Irrigation Area will be prolonged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.