सिंचनासाठी होणारी फरफट ही पूर्वीच्या शासनाचे पाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 09:39 PM2018-10-03T21:39:32+5:302018-10-03T21:39:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : दरवर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेच प्रकल्पाचे पाणी शेतीला वेळेवर मिळत नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांना नानाविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सिंचनासाठी होणारी फरफट ही पूर्वीच्या शासनाचे पाप आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी नागपूर महानगर पालिकेला २०११ मध्ये वाढवून दिल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याचा घणाघाती आरोप आमदार चरण वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रकल्पचे पाणी मिळत नाही. यासाठी ठिकठिकाणी आंदोलन व रास्ता रोको करून अधिकारी व प्रशासनाला वेठीस धरण्यात येत आहे. पण यामुळे समस्या सुटणार नसून काही ठराविक राजकारण्यांचे फावणार आहे. शेतकºयांना पाणी मिळत नाही ही समस्या अनेक वर्षांपासून जैसी थे आहे. याला कारण म्हणजे २०१० मध्ये मध्यप्रदेश शासनाने बांधलेले चौराई धरण आहे. हे धरण तयार करताना जिल्ह्यातील मोहाडी व भंडारा तालुक्याला शेतीसाठी देण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन पूर्वीच्या सरकारने केले नाही.
मोहाडी व भंडारा तालुक्यातील ३० हजार हेक्टर शेतजमीन ही नागपूर पेंचच्या पाण्यावर अवलंबून आहे. या प्रकल्पाचे पाणी नागपूर महानगर पालिकेला देण्यात येते. २०११ पूर्वी महानगर पालिकेला ७८ एमएम क्यूब देण्यात येत होते. २०११ साली पाणी वाढवून १९० एमएम क्यूब देण्याचा करार करण्यात आला. प्रकल्पाची क्षमता कमी आणि नागपूरला देण्यात येणारे पाणी जास्त अशी अवस्था झाली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी मिळत नाही. मोहाडी व भंडारा तालुक्यातील शेतकरी हे वरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. शेतकºयांना पाणी पुरवण्याचा करार असूनही वेळेवर पाणी मिळत नाही. याला मुख्य कारण म्हणजे पाण्याचे नियोजन न करणे आहे.
राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने ११०० कोटी रुपयाचे नियोजन शेतकऱ्यांसाठी केले आहे. हत्तीडोई जंकशनवर सोलरवर चालणारी लिफ्ट आणि लिफ्ट सोलर चालणारी सूर नदीवर बंधारा व काटी वितरिकेवर लिफ्ट असे विविध कामाचे निरीक्षण सुरु आहे. दोन वर्षात शेतकºयांना नियमित व मुबलक पाणी सिंचनासाठी मिळेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. हे काम पूर्णत्वास आल्यास ६ किमी पर्यंत बॅक वॉटर राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे मोहाडी व भंडारा तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीचे उत्पन्न वाढवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध राहणार असल्याचे त्यांनी वरठी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य रवी येळणे व ग्राम पंचायत सदस्य संदीप बोंद्रे उपस्थित होते.
आंदोलनानंतर पाणी कुठून आले ?
पेंच प्रकल्पात पाण्याचा साठा मुबलक आहे. दोन महिन्यांपासून शेतकरी पाण्याची मागणी करीत आहेत. मागणी केल्यावर पाणी दिले असते तर शेतकऱ्यांना रस्त्यावर येण्याची आवश्यकता पडली नसती. पाणी असून पाणी न सोडता आंदोलन केल्यावर पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन देणे ही अधिकाºयांची बदमाशी आहे. आंदोलन झाल्यावर धरणात पाणी आले कुठून? असा प्रतिप्रश्न उपस्थित केलो. जर पाणी आहे तर वेळेवर दिले नाही म्हणून अधिकाºयावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.