वर्षानुवर्षे प्रलंबित बौद्ध विद्यापीठाची स्थापना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:14 PM2017-11-06T23:14:19+5:302017-11-06T23:14:39+5:30
प्राचीन बौद्ध ज्ञान परंपरा, संस्कृती आणि बौद्ध विद्येच्या संवर्धनासाठी आवश्यक अशा बौद्ध विद्यापीठाची स्थापना झाली पाहिजे,....
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्राचीन बौद्ध ज्ञान परंपरा, संस्कृती आणि बौद्ध विद्येच्या संवर्धनासाठी आवश्यक अशा बौद्ध विद्यापीठाची स्थापना झाली पाहिजे, यासह सात ठराव रविवारला भंडारा येथे आयोजित राज्यस्तरीय आंबेडकरी विचार संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात सार्वमताने पारित करण्यात आले.
आंबेडकरी विचार जागृती समितीच्यावतीने आंबेडकरी विचार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचा समारोप सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी विशेष अतिथी म्हणून माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील होते. अतिथी म्हणून साहित्यिक व समीक्षक डॉ.अनिल नितनवरे होते. याप्रसंगी डॉ.अनिल नितनवरे यांनी ठरावाचे वाचन केले. यात अनेक वर्षांपासून प्रलंबित अशा बौद्ध कायद्याच्या मसुद्याला कायद्याचे मिळवून देऊन या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, भंडारा नगरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने व सहवासाने ऐतिहासिक झालेल्या स्थळांना डॉ.आंबेडकर यांची स्मारक स्थळे म्हणून घोषित करण्यात यावी, बौद्ध संस्कृतीच्या अवशेष असलेल्या अनेक वास्तु, स्तुप व स्मारके यांचे उत्खनन करून त्यांचा विकास व संवर्धन करण्यात यावे, मागास घटकांचे आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण, शिष्यवृत्तीच्या समस्या आणि आर्थिक सबलीकरणाचे प्रश्न याविषयी साशंकता केंद्र व राज्य शासनाने थांबवावी, बाबासाहेबांच्या ग्रंथांचे थांबलेले प्रकाशन पुन्हा गतीमान व्हावे, संपलेल्या ग्रंथाच्या नव्या आवृत्त्या प्रकाशित कराव्यात, भंडारा शहरातील सामाजिक व सांस्कृतिक तसेच सार्वजनिक कार्यक्रमासाठी शासनाने एका सांस्कृतिक सभागृहाची निर्मिती करावी अशा सात ठरावांचा समावेश आहे.
समारोप कायक्रमाचे प्रास्ताविक जयप्रकाश भवसागर, सुभंत राहाटे यांनी केले. संयोजन रूपचंद रामटेके यांनी तर आभारप्रदर्शन निमंत्रक अमृत बन्सोड यांनी केले. संमेलनासाठी स्वागताध्यक्ष डी.एफ. कोचे, अध्यक्ष जयप्रकाश भवसागर, कार्याध्यक्ष महादेव मेश्राम, संघटन सचिव रूपचंद रामटेके, कोषाध्यक्ष प्रभाकर भोयर, मार्गदर्शक महेंद्र गडकरी, प्रेमसागर गणवीर, राजकुमार गजभिये, डॉ.रविंद्र वानखेडे, मोरेश्वर बोरकर, म.दा. भोवते, असित बागडे, एम.डब्ल्यु. दहिवले, राहुल डोंगरे, समाजभूषण डी.व्ही. बारमाटे, गुलशन गजभिये, राजेश बौद्ध, यशवंत उपरीकर, रामचंद्र अंबादे, डी.जी. रंगारी, प्रेम सूर्यवंशी, रत्नमाला वैद्य, अरूण गोंडाणे, माया उके, डॉ.सुनिल जिवनतारे, अरूण अंबादे, आशू गोंडाणे, करण रामटेके, बाळकृष्ण शेंडे, अजय तांबे, प्रशांत बागडे, आदिनाथ नागदेवे, सचिन बागडे, आहुजा डोंगरे, पुष्पा मेश्राम, शालीदीप गजभिये, गौतम कावळे, नरेंद्र बन्सोड, मोरेश्वर गेडाम, आदींनी सहकार्य केले.