१४ वर्षांनंतरही केवळ ८ कि.मी. ची मुख्य वितरिका

By admin | Published: August 24, 2016 12:13 AM2016-08-24T00:13:02+5:302016-08-24T00:13:02+5:30

शेतकऱ्यांसाठी हरितक्रांतीचे स्वप्न बनलेल्या नेरला उपसा सिंचन योजनेचे १४ वर्षानंतरही काम संथगतीने सुरु आहे.

Even after 14 years, only 8 km Main distributor of chi | १४ वर्षांनंतरही केवळ ८ कि.मी. ची मुख्य वितरिका

१४ वर्षांनंतरही केवळ ८ कि.मी. ची मुख्य वितरिका

Next

विशाल रणदिवे अड्याळ
शेतकऱ्यांसाठी हरितक्रांतीचे स्वप्न बनलेल्या नेरला उपसा सिंचन योजनेचे १४ वर्षानंतरही काम संथगतीने सुरु आहे. १४ वर्षात येथील मुख्य वितरण नलिकेचे केवळ ८ कि.मी. चे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या परिसराचे शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न अजूनही धुसर आहे. या प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी तीन पंपांची चाचणी सुरु झाली आहे.
सन २००२ पासून नेरला उपसा सिंचन योजनेचे काम सुरु आहे. कोट्यवधी रुपये खर्चून तयार होत असलेल्या या सिंचन प्रकल्पातून परिसरातील २१ हजार ७२७ हेक्टर क्षेत्रातील शेती ओलीताखाली येणार आहे. मात्र गेल्या १४ वर्षापासून या सिंचन प्रकल्पासाठी ४३.८०० कि.मी. ची मुख्य वितरण नलिका तयार करणे गरजेचे होते.
मात्र काम संथगतीने सुरु असल्याने आतापर्यंत केवळ ८ कि.मी. ची मुख्य वितरण नलिका तयार झाली आहे. या ८ कि.मी. च्या अंतरात ५ हजार हेक्टर शेती ओलीताखाली यायला हवी. मात्र सध्या सुरु असलेल्या चाचणीसाठी पाणी सोडण्यात येत असल्याने ८०० हेक्टर शेतीलाच याचा लाभ मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न आणखी किती दिवस लांबणार यावर शेतकरी चातकासारखी वाट बघण्यात दिवस काढत आहेत.
नेरला उपसा सिंचन योजनेसाठी नेरलासह परिसरातील गावातील शेतीचे भूसंपादन शासनाने केले आहे. नेरला गावाला या सिंचन योजनेचा मोठा फटका बसला असून त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी अद्यापही शासनदरबारी प्रलंबित आहे. त्यामुळे या गावाचे पुनर्वसन करून ग्रामस्थांना नागरी सुविधा पुरवाव्या अशी मागणी नेरला येथील सरपंच अनिल कोदामे यांनी केली आहे. शेतकऱ्यासाठी महत्वाकांक्षी ठरणाऱ्या या नेरला सिंचन प्रकल्पाचे काम संथगतीने असले तरी मागील काही दिवसांपासून हा प्रकल्प त्वरीत सुरु करण्याची मागणी नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी रेटून धरली. त्यामुळे या सिंचन प्रकल्पाचे उद्घाटन करण्याच्या हालचाली आता सुरु झालेल्या आहेत. तत्पूर्वी सिंचन प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी योग्य आहे किंवा नाही यासाठी संबंधित विभागाकडून १५ पंपांपैकी ३ पंपांमधून चाचणी सुरु केलेली आहे.
या चाचणीच्या माध्यमातून सोडण्यात येणारे पाणी ८ कि.मी. पर्यंत बनविण्यात आलेल्या मुख्य वितरण नलीकेपर्यंत पोहचत आहे. त्यामुळेच या नलिकेच्या परिसरात असलेल्या शेतकऱ्यांना तब्बल १४ वर्षानंतर काही दिवसांसाठी असेना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे काही शेतकरी समाधानी असले तरी अनेकांना या पाण्यापासून अद्यापही वंचित राहावे लागत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. दरम्यान खासदार नाना पटोले यांनी नेरला उपसा सिंचन योजनेला भेट दिली. यावेळी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. येथील अधिकाऱ्यांनी मागील सहा महिन्यांपासून रात्रंदिवस काम करून सिंचन योजना त्वरीत सुरु होण्याच्या बाबतीत मोलाचे कार्य केले आहे.

शाखा कालव्यांचे काम रखडले
नेरला उपसा सिंचन योजनेची मुख्य नलिका ४३.८०० कि.मी. ची आहे. त्यापैकी केवळ ८ कि.मी. ची मुख्य नलिका तयार करण्यात आली आहे. यासोबतच सदर पाणी शाखा कालव्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांध्यापर्यंत पोहचणार आहे. मात्र शाखा कालव्यांचे काम अद्यापही अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे शाखा कालवे सिंचनासाठी अडसर ठरले आहे.

नेरला गावाचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करू. ग्रामस्थांच्या सर्व समस्या लवकर शासन स्तरावरून सोडविण्यासाठी पुढाकार घेऊ.
- नाना पटोले, खासदार.
या प्रकल्पामुळे परिसरातील हजारो हेक्टर शेतजमिनीला फायदा होईल. १२ पंपापैकी ३ पंपांची चाचणी सुरु आहे. शाखा कालव्यांचे काम वर्षभरात पूर्ण करू.
- एच.बी. मेंढे, कार्यकारी अभियंता, नेरला सिंचन.

Web Title: Even after 14 years, only 8 km Main distributor of chi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.