सात दशकांनंतरही आदिवासीबहुल गावात पायवाटेनेच करावा लागतो प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:25 AM2021-06-03T04:25:32+5:302021-06-03T04:25:32+5:30
गोबरवाही येथून ५ किलोमीटर अंतरावर जंगलव्याप्त आदिवासीबहुल गाव सोदेपूर आहे. या गावात जाण्याकरिता कच्च्या व अरुंद पायवाटेने प्रवास करावा ...
गोबरवाही येथून ५ किलोमीटर अंतरावर जंगलव्याप्त आदिवासीबहुल गाव सोदेपूर आहे. या गावात जाण्याकरिता कच्च्या व अरुंद पायवाटेने प्रवास करावा लागतो. या गावात साधा आठवडी बाजार, आरोग्याच्या सुविधा, बँक, पोस्ट ऑफिस, वीज वितरण कार्यालय, साधे बस स्टॅन्ड नाही. त्यामुळे प्रत्येक कामाकरिता येथील ग्रामस्थांना गोबरवाही येथे पायवाटेने यावे लागते. रुग्णवाहिकेला या गावात जाण्याकरिता सुमारे तेरा किलोमीटरचा लांब अंतराचा पल्ला गाठावा लागतो. याकरिता गुढरी, सीतासावंगी या मार्गाने जावे लागते.
सोदेपूर, गोबरवाही रस्ता प्रस्तावित आहे. परंतु १९८० मध्ये वन अधिनियम कायदा मंजूर झाल्याने प्रस्तावित रस्त्याचे बांधकाम रखडले. हा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त आहे. सोदेपूर गाव हे शंभर टक्के आदिवासी गाव आहे. दुसरीकडे राष्ट्रीय राज्य महामार्ग बांधकामाकरिता हजारो झाडांची कत्तल केली जात आहे. परंतु जंगल परिसरामध्ये हे गाव असल्यामुळे रस्ता बांधकामाकरिता झाडांची कत्तल करावी लागत असल्याने येथे वनविभाग त्याला परवानगी देत नाही, अशी माहिती आहे. सोदेपूर गावाला जाणारा रस्ता बांधकामाकरिता मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्याची गरज नाही. कारण हा रस्ता निमुळता व पायवाटेचा राहणार आहे. सदर रस्ता बांधकामाकरिता लोकप्रतिनिधींनी येथे दखल घेण्याची गरज आहे.