दोन बैठकीनंतरही रस्ता बांधकामाबाबत तोडगा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 10:51 PM2018-12-21T22:51:23+5:302018-12-21T22:52:12+5:30
भंडारा शहरातून जाणाऱ्या ५४७-ई या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम नगरपालिका प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे थांबविण्यात आले. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पालिका प्रशासन व संबंधित विभागांमध्ये दोनदा बैठक घेण्यात आली. परंतु, त्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. परिणामी, महामार्गाचे बांधकाम रखडले असून, नागरिकांना अस्ताव्यस्त वाहतुकीचा फटका बसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा शहरातून जाणाऱ्या ५४७-ई या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम नगरपालिका प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे थांबविण्यात आले. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पालिका प्रशासन व संबंधित विभागांमध्ये दोनदा बैठक घेण्यात आली. परंतु, त्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. परिणामी, महामार्गाचे बांधकाम रखडले असून, नागरिकांना अस्ताव्यस्त वाहतुकीचा फटका बसत आहे.
शहरातून जिल्हा परिषद चौक ते खातरोड असे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४७-ई चे काम केले जात आहे. सदर महामार्गार्च बांधकाम एचजी इन्फ्रा या कंपनीला १८ महिन्यापूर्वी देण्यात आले. या महामागार्चे अर्धेअधिक काम झाले आहे. दरम्यान, महिनाभरापूर्वी कंपनीने जिल्हा परिषद चौकापासून कामाला सुरुवात केली. जिल्हा परिषद चौक ते साई मंदिरपर्यंत रस्त्याची एक बाजू पूर्णपणे खोदण्यात आली. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. दरम्यान, रस्त्याच्या कामाचा अंतिम डीपीआर नगरपालिकेला विश्वासात घेऊन तयार करण्यात आला नसल्याचा आक्षेप पालिकेने घातला. शहरात होऊ घातलेली पाणीपुरवठा योजना, भूयारी गटार योजना, पथदिवे या बांधकामामुळे प्रभावित होत असल्यामुळे हे काम थांबविण्यात आले. तेव्हापासून नागरिकांना अर्धवट असलेल्या रस्त्याचा त्रास होत आहे.
यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नगर पालिका व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये दोनदा बैठक झाली. परंतु, त्यात काहीही फलित निघाले नाही. दुसरीकडे, रस्ता उखडून ठेवल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या मार्गावर काही अपघातही घडले. अखेरीस कंपनीने खोदलेल्या रस्त्यावर मुरुम टाकून तो रस्ता समतल केला. आता मात्र नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषद चौक ते खातरोडवरील केशवनगरपर्यंत हे काम रखडले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पालिका प्रशासन व अन्य विभागांमध्ये तिसरी बैठक लवकरच होणार आहे. या बैठकीत तरी तोडगा निघून महामार्गाचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
आराखड्यात दिरंगाई
रखडलेल्या महामार्गासंबंधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नगर पालिका, उपविभागीय अधिकारी, भूमिअभिलेख विभाग व एचजी इन्फ्रा या कंपनीच्या अधिकाऱ्यांची २८ नोव्हेंबर व ६ डिसेंबर अशा दोनदा बैठका झाल्या. यामध्ये नगर पालिकेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला बांधकामाबाबत विविध उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, १५ दिवसांचा कालावधी होऊनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्ग बांधकामाचा अंतिम आराखडा तयार करून पालिकेला सादर केला नाही.