दोन महिने उलटूनही 'रोहयो' कामाची मजुरी मिळेना!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 01:30 PM2024-07-29T13:30:18+5:302024-07-29T13:32:10+5:30

मजुरांची आर्थिक कोंडी : पैशाविना रोहयो मजुरांच्या कुटुंबांवर उपासमारीची संकट

Even after two months, 'MNREGA' did not get wages! | दोन महिने उलटूनही 'रोहयो' कामाची मजुरी मिळेना!

Even after two months, 'MNREGA' did not get wages!

लोकमत न्यूज नेटवर्क 
किटाडी :
शासनाच्या मग्रारोहयो अंतर्गत लाखनी तालुक्यातील किटाडी येथे स्थानिक प्रशासनाच्या वतीने मामा तलावाच्या खोलीकरणाचे काम मे २०२४ मध्ये पूर्ण करण्यात आले. मात्र, जवळपास दोन महिन्यांपासून मजुरांच्या बचत खात्यात कामाचा मोबदला मजुरीच्या स्वरूपात जमा न झाल्याने हातावर आणून पानावर खाणाऱ्या मजुरांची आर्थिक कोंडी होत आहे.


परिणामी, मजूर अडचणीत सापडले आहे. या परिस्थितीत शासनाने मग्रारोहयोच्या अकुशल कामाची मजुरी तत्काळ बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी ग्रामरोजगार सेवक रमेश कोहपरे यांच्यासह मजूर वर्गाकडून केली जात आहे.


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात गाव पातळीवरील विकासकामांना गती येते. या योजनेच्या माध्यमातून जॉब कार्डधारक मजुरांना किमान शंभर दिवस काम देण्याची हमी दिली जाते व गावातील मजूर वर्गाला गावातच रोजगार उपलब्ध करून दिला जातो.


कामाचा मोबदला म्हणून नोंदणीकृत हजेरीपटावरील मजुरांची मजुरी त्यांच्या बचत खात्यावर जमा केली जाते. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही केलेल्या कामाची मजुरी अजूनपर्यंत मिळाली नसल्याने मजूर वर्गात तीव्र रोष निर्माण झाला आहे.

मजुरांना त्यांच्या कष्टाचा मोबदला कधी?
ग्रामीण भागात उन्हाळ्यात मग्रारोहयो अंतर्गत मोठ्या प्रमाणात अकुशल कामे केली जातात. मजूर वर्ग आपल्या कुटुंबासह उन्हातान्हात घाम गाळूनही वेळेवर कामाची मजुरी उपलब्ध होत नाही. मजुरांना त्यांच्या कष्टाचा मोबदला कधी मिळणार? याकडे मजुरांचे लक्ष लागून आहे. आता अर्धा पावसाळा लोटूनही उन्हाळ्यात केलेल्या रोहयो कामाची मजुरी अद्याप मिळाली नाही. शासन याबाबत उदासीन असल्याचे दिसते. असे म्हटल्यास वावगे ठरू नये.


"मग्रारोहयो अंतर्गत उन्हाळ्याच्या दिवसात तलावाचे गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले. मात्र, गत दीड ते दोन महिन्यांपासून कामाची रक्कम खात्यात वळती झाली नाही. त्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. आपल्या कष्टाचे पैसे बँक खात्यात जमा झाले का, याची चौकशी करून मजूर हवालदिल झाले आहेत. गोरगरीब मजुरांचा व त्यांच्या कुटुंबाचा तरी शासनाने विचार करावा."
- रामानंद निपाणे, मजूर, किटाडी.

Web Title: Even after two months, 'MNREGA' did not get wages!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.