मोबाईलच्या जमान्यातही लँडलाईन, क्वाईन बॉक्सची ट्रिंग ट्रिंग मात्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:42 AM2021-09-07T04:42:43+5:302021-09-07T04:42:43+5:30
भंडारा : सध्या मोबाईलचा जमाना असला तरी जिल्ह्यात अजूनही लँडलाईनधारक आहेत. जिल्ह्यात सद्य:स्थितीला ४६५५ लँडलाईनधारक असून, क्वाईन बॉक्सची संख्या ...
भंडारा : सध्या मोबाईलचा जमाना असला तरी जिल्ह्यात अजूनही लँडलाईनधारक आहेत. जिल्ह्यात सद्य:स्थितीला ४६५५ लँडलाईनधारक असून, क्वाईन बॉक्सची संख्या मात्र शून्य आहे. पंधरा ते २० हजारांपेक्षा जास्त ग्राहक संख्या असलेल्या भंडारा जिल्ह्यात लँडलाईनधारकांची संख्या फारच कमी झालेली दिसून येत आहे.
पूर्वी घरी लँडलाईन फोन असणे म्हणजे श्रीमंतीचे व प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जात असायचे. ज्या जमान्यात मोबाईल नव्हते, तेव्हा घरात लँडलाईन फोनचा वापरही अधिक होता. कालांतराने क्वाईन बॉक्सचीही संख्या वाढली होती. मात्र, हळूहळू क्वाईन बॉक्सही नामशेष झाले आहेत. त्यावेळी क्वाईन बॉक्स ठेवणाऱ्या व्यावसायिकांना कमिशनही मिळत होते. मात्र, मोबाईलच्या आधुनिकीकरणामुळे क्वाईन बॉक्स व लँडलाईनधारकांची संख्याही कमी झाली आहे. व्यावसायिकांकडे लँडलाईनची संख्या अधिक दिसून येते. लँडलाईन जोडणी घेण्याकडेही कल फारच कमी झाला आहे. मोबाईलची रेंज मिळत नाही म्हणून लँडलाईनला पसंती दिली जायची. याशिवाय शासकीय कार्यालयात लँडलाईनचा नियमितपणे वापर होत आहे.
बॉक्स
जिल्ह्यात केवळ ४६५५ लँडलाईनधारक
पूर्वी पंधरा हजारांपेक्षा जास्त लँडलाईनधारकांची संख्या होती. बीएसएनएलकडे याची संपूर्ण जबाबदारी होती. कालांतराने प्रत्येक नागरिकाच्या हातात स्मार्टफोन आल्याने नागरिकांनी हळूहळू लँडलाईन घरातून हद्दपार केले. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ४६५५ लँडलाइनधारक आहे. या ग्राहकांची संख्या मोबाईलच्या वापरामुळे झपाट्याने घटल्याचे दिसून येते.
बॉक्स
व्यवसायाकरिता क्वाईन बॉक्स
गत दोन दशकांपासून मोबाईलचा वापर अचानक वाढल्याने व्यवसाय करीत असलेल्यांकडे क्वाईन बॉक्सची संख्याही कमी होत गेली. सध्या तर जिल्ह्यात कुठेही क्वाईन बॉक्स नाहीत. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या व्यक्तीही दुसऱ्या व्यवसायात गुंतल्या आहेत.
बॉक्स
जिल्ह्यात क्वाईन बॉक्सची संख्या शून्य
बीएसएनएलकडून कनेक्शन घेतलेले जिल्ह्यात क्वाईन बॉक्स होते. काही हौशी व्यावसायिक हे क्वाईन बॉक्स नियमितपणे चालवीत होते. त्यातून त्यांना कमिशनही मिळत होते. सद्य:स्थितीत जिल्ह्यात कुठेही क्वाईन बॉक्स नाहीत. मोबाईलच्या जमान्यात क्वाईन बॉक्सचा वापर आता केला जात नाही. किंबहुना आता ते नेहमीसाठी हद्दपार झाले आहेत.
कोट बॉक्स
लँडलाईनचा वापर आवश्यकच
अनेक वर्षांपासून घरी व दुकानात लँडलाईन आहे. यावरच आमचा व्यवहार सुरू असतो. आम्हाला लँडलाइनची सवय झाली आहे. मोबाईल असले तरी कधीकधी रेंज नसल्यामुळे लँडलाईनचा आधार घ्यावाच लागतो.
एक लँडलाईन ग्राहक, भंडारा