पावसाळ्यातही बावनथडी प्रकल्प निरंक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 10:37 PM2019-07-29T22:37:44+5:302019-07-29T22:38:20+5:30
पावसाळा सुरू होवून सुमारे दीड महिन्याचा कालावधी लोटला तरीही आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पात जलसाठा निरंक आहे. सध्या या प्रकल्पात मृतसाठा ७.५० टक्के असून ही शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे.
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : पावसाळा सुरू होवून सुमारे दीड महिन्याचा कालावधी लोटला तरीही आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पात जलसाठा निरंक आहे. सध्या या प्रकल्पात मृतसाठा ७.५० टक्के असून ही शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे.
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेवरील सीतेकसा गावाजवळ बावनथडी नदीवर राजीव सागर प्रकल्प उभारण्यात आला. ३५ वर्षापुर्वी या प्रकल्पावर दोनही राज्यांनी एक हजार ८३८ कोटी रूपये खर्च केले. त्यात महाराष्ट्राचा वाटा ८३६ कोटी आहे. दोन्ही राज्यांनी आपापल्या क्षेत्रात कालवे, वितरेकीची कामे पूर्ण केली. शेतकºयांकडून कोट्यवधींची जमीन खरेदी केली. या प्रकल्पात अनेक विघ्न आले. परंतु शेवटी हा प्रकल्प पुर्णत्वास आला. तुमसर तालुक्यासाठी हा प्रकल्प वरदान आहे. परंतु यंदा या प्रकल्पाचा जलसाठा निरंक आहे.
दीड महिन्यापासून पावसाळ्याला प्रारंभ झाला. परंतु पावसाने दडी मारली. त्यामुळे बावनथडी नदी अद्यापही कोरडी आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास रबी हंगामात शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळणे कठीण जाणार आहे. शेतकºयांसोबत सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा असून कधी एकदा वरुण राजा बरसतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.
मृतसाठ्यातून पाण्याचा विसर्ग नाही
बावनथडी प्रकल्पात उपयुक्त जलसाठा निरंक असून मृतसाठा ७.५० टक्के आहे. नियमानुसार मृत साठ्यातून पाण्याचा विसर्ग करता येत नाही. त्यामुळे आस्मानी संकटाचा सामना शेतकºयांना करावा लागत आहे. या धरणाकडून शेतकºयांना मोठी आशा होती. परंतु अपुºया पावसामुळे आशा मावळली आहे.
पावसाची रिमझिम
गत तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला. परंतु पाऊस रिमझिम कोसळत आहे. पावसाला जोर नाही. केवळ वातावरणात गारवा निर्माण झाला. यंदा जिल्ह्यावर निसर्ग कोपला आहे. धरण क्षेत्रात दमदार पाऊस नाही. मध्यप्रदेशातही पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे सारे हतबल दिसत आहे.
बावनथडी प्रकल्पात सध्या उपयुक्त जलसाठा निरंक असून मृतसाठा ७.५० टक्के आहे. मृतसाठ्यातून पाण्याचा विसर्ग करता येत नाही. धरण क्षेत्रात जोरदार पावसाची गरज आहे.
-आर. आर. बडोले,
उपविभागीय अभियंता, तुमसर