पाऊस बरसला तरीही दुष्काळातून सुटका नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 01:14 AM2019-07-27T01:14:23+5:302019-07-27T01:15:23+5:30
तीन आठवड्याच्या दडीनंतर जिल्ह्यात गुरूवारपासून पावसाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस बरसत असला तरी यंदा शेतकऱ्यांची दुष्काळातून सुटका मात्र दिसत नाही. महिनाभरापूर्वी टाकलेले पऱ्हे पुर्णत: निकामी झाले असून रोवणीयोग्य पाऊस झाला तरी पऱ्हे आणावे कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तीन आठवड्याच्या दडीनंतर जिल्ह्यात गुरूवारपासून पावसाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस बरसत असला तरी यंदा शेतकऱ्यांची दुष्काळातून सुटका मात्र दिसत नाही. महिनाभरापूर्वी टाकलेले पऱ्हे पुर्णत: निकामी झाले असून रोवणीयोग्य पाऊस झाला तरी पऱ्हे आणावे कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तब्बल एक लाख ६७ हजार ४८५ हेक्टरवरील पेरणी रखडली आहे. या पेरणीसाठी आता शेतकऱ्यांकडे पऱ्हेच नसल्याची माहिती आहे.
भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी मशागत केली. पºह्यांसाठी नर्सरी तयार केली. आर्द्रा नक्षत्रात पाऊस झाला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. नर्सरीतील पऱ्हे वाचविण्याची शेतकºयांची धडपड सुरू झाली. कुणी गुंड भरण्याने तर कुणी ट्रॅक्टरने पाणी आणून पऱ्हे वाचवित होते. परंतु तब्बल तीन आठवडे पावसाने दडी मारली. उन्हाळ्यासारखे उन्ह तापत होते. परिणामी शेतातील पऱ्हे निकामी झाले. आता गुरूवारपासून पावसाला सुरूवात झाली. मात्र बहुतांश शेतकऱ्यांजवळ असलेले पºहे रोवणीलायक राहिलेच नाही.
भंडारा जिल्ह्यात लागवडलायक क्षेत्र दोन लाख चार हजार ९५२ हेक्टर आहे. त्यात एकट्या भाताचे क्षेत्र एक लाख ८१ हजार ३२९ हेक्टर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १३ हजार ८४४ हेक्टरवर रोवणी आटोपली आहे. भातक्षेत्राच्या केवळ आठ टक्केच रोवणी आटोपली. पावसाअभावी संपूर्ण कामे ठप्प झाली होती. आता पाऊस बरसत असला तरी या पावसाचा फायदा शेतकऱ्यांवर होण्याची आशा दिसत नाही. आज पाऊस १५ दिवस आधी बरसला असता तर रोवणीची कामे झाली असती. परंतु पावसाने दडी मारली आणि शेतकरी दुष्काळाच्या खाईत लोटला गेला.
२४ तासात ४३ मिमी पाऊस
भंडारा जिल्ह्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचे गुरूवार दुपारपासून आगमन झाले. शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात ४३ मिमी पावसाची नोंद झाली. भंडारा तालुक्यात ४७ मिमी, मोहाडी ६८.३ मिमी, तुमसर ४३ मिमी, पवनी ४०.२ मिमी, साकोली ३०.६ मिमी, लाखांदूर ३०.६ मिमी, लाखनी ४६.४ मिमी पावसाची नोंद झाली.
शेतीत लगबग वाढली
पावसाला प्रारंभ झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने शेताकडे धाव घेतली आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील बहुतांश भागात रोवणीच्या कामाला सुरूवात झाली होती. शेतशिवार मजुरांनी गजबजल्याचे दिसत होते.
उकाड्यातून सुटका
गत तीन आठवड्यापासून उकाड्याचा असाह्य त्रास सहन करणाºया नागरिकांची दोन दिवसापासून बरसणाऱ्या पावसामुळे सुटका झाली. उन्हाळ्यासारखे उन्ह तापत असल्याने जीव कासावीस होत होता. अनेकांनी काढून ठेवलेले कुलर पुन्हा सुरू केले होते.