उन्हाच्या प्रतिकुलतेतही पोलिसांनी बजावले चोख कर्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 04:01 PM2024-06-06T16:01:26+5:302024-06-06T16:03:06+5:30

Bhandara : मतमोजणी बंदोबस्तासाठी राबली खाकी

Even in the heat of the day, the police did a good job | उन्हाच्या प्रतिकुलतेतही पोलिसांनी बजावले चोख कर्तव्य

Even in the heat of the day, the police did a good job

विलास खोब्रागडे
लोकमत न्यूज नेटवर्क
सिल्ली:
भंडारा / गोंदिया लोकसभेसाठी मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून पलाडी येथील शासकीय इमारतीत मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता; मात्र, रात्रंदिवस कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना उभे राहण्यासाठी किंवा सावलीत बसण्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नव्हती, त्यामुळे भर उन्हात रस्त्याच्या कडेला उभे असणाऱ्या पोलिसांचे हाल झाल्याचे दिसून आले. मात्र, भर उन्हातही कोणतीही कुरकुर न करता पोलिसांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावले.


भंडारा गोंदिया लोकसभा मतमोजणीसाठी शेकडो पोलिस तैनात केले असून, सुरक्षेच्या कारणास्तव मतमोजणीच्या आदल्या दिवसापासून पोलिस बंदोबस्त होता. यात स्थानिक पोलिसांसह बाहेरून विशेष पोलिसांची कुमक पाचरण करण्यात आली होती.


मात्र, मतमोजणी बंदोबस्तात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना दिसली नाही. त्यामुळे उन्हातान्हात उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या सावलीचा आसरा घेतल्याचे चित्र दिसले. तर काही पोलिसांना दिवसभर सावलीच मिळाली नाही. त्यामुळे फिरत्या शौचालयाच्या गाडीजवळ बसण्याची वेळ आली. दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी उकाडा मात्र कायम होता. कसलीही व्यवस्था नसताना वा झाडांची सावली नसतानाही पोलिसांनी कर्तव्य बजावले.


लहान बाळाची काळजी
अनेक महिला पोलिस कर्मचाऱ्यांची मतमोजणी बंदोबस्ताकारिता ड्यूटी लावण्यात आली असून, मुक्कामी कर्तव्य बजावत असताना घरी असणाऱ्या लहान बाळाची काळजी सतावत असल्याचे जाणवले. पोलिस दलात नव्याने दाखल झालेल्या काही पोलिस कर्मचाऱ्यांचा पहिलाच बंदोबस्त असल्याचे सांगितले. दिलेली जबाबदारी समर्थपणे पूर्ण करण्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. इतर बंदोबस्तापेक्षा मतमोजणीचा बंदोबस्त वेगळा असल्याचे जाणवले. कारण दोन्ही बाजूच्या राजकीय पक्ष, उमेदवार तसेच सामान्य नागरिकांचे पोलिसांच्या कामावर लक्ष असल्याचे सांगितले.


पोलिसांकडे दुर्लक्ष
बंदोबस्तातील पोलिस हे दुर्लक्षित असून, बंदोबस्त स्थळी थंड पाणी, बसण्याची व्यवस्था, चहा, नास्ता किंवा वेळेवर जेवण उपलब्ध करण्यासाठी प्रशासन किंवा कोणत्याही राजकीय नेत्याचे लक्ष नसते, अशी खंतही पोलिसांच्या मनात आहे.
 

Web Title: Even in the heat of the day, the police did a good job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.