एमपीएससी परीक्षा देण्यालाही आता ६-९ संधीचे बंधन, विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:29 AM2021-01-04T04:29:24+5:302021-01-04T04:29:24+5:30
भंडारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) परीक्षा देण्याच्या संधीची कमाल मर्यादा आता निश्चित केली आहे. परीक्षार्थीना आता सहा संधी ...
भंडारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) परीक्षा देण्याच्या संधीची कमाल मर्यादा आता निश्चित केली आहे. परीक्षार्थीना आता सहा संधी मिळणार असून मागास प्रवर्गांसाठी नऊ संधी राहणार आहेत. २०२१ च्या जाहिरातीपासून हे लागू होणार आहे. परंतु या निर्णयाबाबत स्पर्धा परीक्षा तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देण्यासाठी आता संधीची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. खुल्या प्रवर्गातील परीक्षार्थीला सहा, मागास प्रवर्गातील परीक्षार्थीला नऊ तर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी वयाच्या २१ व्या वर्षीपासून परीक्षा देता येतात आणि फक्त वयाची अट नसल्याने विद्यार्थी केवळ परीक्षा देत बसतात. परीक्षा देण्यासाठी आलेल्या अटीमुळे आता नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळेल. अगोदर जुने विद्यार्थी वर्षानुवर्ष तयारी करीत असल्यामुळे मुख्य परीक्षेस पात्र होत पण आता ते बाद झाल्यानंतर नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळेल.
अशाप्रकारे होईल संधीची गणना
एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिशा मिळेल
एमपीएससीने परीक्षा देण्याच्या संधीची कमाल मर्यादा निश्चित करण्याचा निर्णय योग्य आहे. यामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच दिशा मिळून एका वर्षात होणाऱ्या तीन ते चार परीक्षा न देता एकाच पदासाठी म्हणजे विद्यार्थ्यांना निश्चितच पदासाठी अधिकारी म्हणून संधी मिळेल.
- सुजाता रामटेके, उमेदवार
जागा निघतीलच याची शाश्वती काय?
ज्यांनी आतापर्यंत चार वेळा परीक्षा दिली आहे त्यांना मात्र आता एमपीएससीने घेतलेला निर्णय उमेदवाराच्या दृष्टीने १०० टक्के नकारात्मक आहे. कारण दरवर्षी जात प्रवर्गानिहाय निघणाऱ्या जागा कमी-जास्त होतात. दरवेळी आपल्या प्रवर्गाच्या जागा निघतील याची शाश्वती नाही.
-अमित वासनिक, उमेदवार
सर्वांना समान संधी हवी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. यामुळे विद्यार्थ्यांना बी प्लॅनचे नियोजन व्यवस्थित करता येईल. पण यामध्ये सर्वांनाच समान संधी द्यायला हवी होती. कारण निवड प्रक्रिया करताना निवड ही आरक्षणाच्या धर्तीवरच होणार आहे.
-हीना भगत, उमेदवार
वेळेवरच सर्व प्रक्रिया पार पाडावी
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरच एमपीएससीनेही परीक्षेच्या संधी मर्यादित करणारा निर्णय घेतला आहे. काही बाबतीत तो चांगला असला तरी त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची वेळेवर प्रक्रिया पार पाडावी लागेल
-हर्षलता नंदेश्वर, उमेदवार